परभणी,दि (१६) आज सगळं जग विज्ञानाच्या प्रभावाखाली वावरत आहे. हे टाळता येणे ही अशक्य आहे. विज्ञानाची विविध भयावहक दृश्य युद्धाच्या रूपाने दिसू लागली आहेत. अशावेळी अध्यात्म आणि संत साहित्याच्या माध्यमातून विज्ञानाची भयावहकता थांबवता येणे शक्य असल्याचे मत संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉ.तुकाराम महाराज गरुड यांनी शनिवारी (दि.१६) रोजी परभणी येथे केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘संत साहित्याची प्रासंगीकता या विषयावरील एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्रात उदघाटकीय भाषणात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे सदस्य हेमंतराव जामकर, बीजभाषक डॉ.विद्यासागर पाटांगणकर, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.मा.मा. जाधव, महंत देमेराज बाबा कपाटे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य इंजि.नारायण चौधरी, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ.उत्कर्ष किट्टेकर, समन्वयक डॉ.प्रल्हाद भोपे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.गरुड म्हणाले,संत साहित्य अध्यात्मिक विकास करणारे तर आहेच सोबतच ते भक्ती प्रदान ही आहे. राजकारण, धर्म, पंथ यांच्या माध्यमातून विज्ञानाची संहारकता थांबवता येणे शक्य नाही. त्यासाठी समाजात अध्यात्म रुजविणे गरजेचे आहे. अध्यात्माच्या माध्यमातून संत साहित्य रुजवून आजच्या विज्ञानाचे विपरीत परिणाम थांबवले जाऊ शकतात. ज्ञानेश्वरी वैश्विक ग्रंथ आहे. आज ज्या पद्धतीने लहान मुलांच्या हाती मोबाईल दिला जातो याउलट ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला तर समाजात चांगल्या संस्काराला सुरुवात होईल. जीवन सुंदर कसे करावे याचे पूर्ण रूपाने मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय. अशा संत ग्रंथाच्या माध्यमातून आपण विज्ञानाच्या भयावहकतेला कमी करू शकतो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले, संत साहित्याने समाजात समतेची बीजे रुजवली. काळानुरूप मराठी भाषा आणि साहित्यात बदल करून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणले जाऊ शकतात. साहित्यातून नैतिक मूल्यांची शिकवणी दिली तर समाज बदलासाठी महत्वाचे ठरेल असेही ते म्हणाले.
आपल्या बीजभाषणात डॉ. विद्यासागर पाटांगणकर म्हणाले, संत साहित्य सर्वव्यापी आहे. या साहित्याने समग्र माणूस पाहिला त्यामुळे त्यात माणसाचे आत्मानंद आणि संमग्रत्व मिळते. संत साहित्याने समाजाला दिशा दिली आहे. स्वातंत्र्य, समता बंधुता, न्याय हा विचारांचा संस्कार संत साहित्याने समाजावर केला. समकालीन सामाजिक उतरंडीला संत साहित्याने सुरुंग लावला हे कार्य अत्यंत प्रासंगिक आहे असे मत व्यक्त केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते १०८ शोधनिबंधाचा संकलन असलेल्या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्राध्यापक, संशोधक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रल्हाद भोपे, सूत्रसंचालन प्रा.अनिल बडगुजर तर आभार प्रदर्शन डॉ.राजू बडूरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.शेषराव राठोड, डॉ.प्रशांत सराफ, डॉ.जयंत बोबडे, डॉ.सुरेंद्र येनोरकर, डॉ.एम.ए.शेख, डॉ.टी आर.फिसफिसे, प्रा.अतुल समींद्रे, प्रा.अंकुश खटिंग, सुरेश पेदापल्ली, सय्यद सादिक, साहेबराव येलेवाड आदींनी पुढाकार घेतला.