सेलू,दि 1 ( प्रतिनिधी )
जगातील बहुतांशी देशात कोणत्या न कोणत्या कारणाने संविधान तयार झाले आणि रद्दही झाले. परंतु आपल्या संविधानकर्त्यांच्या वैश्विक दूरदृष्टीने तयार झालेले, विशालकाय, विविधतेने नटलेल्या देशाचे, नागरिकांना अधिकार देण्यात सक्षम असलेले संविधान लोकांच्या श्रद्धेमुळे ७५ वर्षांनंतरही मजबूत आहे. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय समन्वयक प्रकाश कारत यांनी केले.
सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे ४९ वे पुष्प शुक्रवारी ( दि.२८ ) रोजी उत्साहात पार पडले. ‘ भारतीय संविधानाची ७५ वर्षे – नवीन आव्हाने ‘ या विषयावर व्याख्याते कॉम्रेड प्रकाश कारत यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. प्रकाश कारत म्हणाले की, ‘ धर्म दुय्यम असावा. राष्ट्र व संविधान मोठे असावे. एक देश एक निवडणूक अव्यवहार्य आहे. आजच्या काळात आर्थिक असमानता तिव्रपणे वाढली आहे. केंद्र राज्यांपेक्षा अधिक प्रबळ होते आहे. राज्य दुर्बल होणे हे एकात्मतेला बाधक आहे. व्यक्तीपूजा ही लोकशाही व्यवस्थेला घातक असते. लोकशाहीच्या पूर्णत्वासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय समानता आवश्यक आहे.’ असेही प्रकाश कारत म्हणाले. सच्चिदानंद डाखोरे, पूजा महाजन यांनी अशोक लिंबेकर लिखित ‘ ये भारत का संविधान है ‘ हे गीत गायले. प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांनी केले. सूत्रसंचालन निलेश बिनायके यांनी केले. व्याख्यानास कॉम्रेड अजीत अभ्यंकर, कॉ. दत्तूसिंग ठाकुर, कॉ. प्राची हतवलेकर, कॉ. रामकृष्ण शेरे, कॉ. भगवान भोजने, कॉ. रामेश्वर पौळ, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, डी.के.देशपांडेगुरूजी, नंदकिशोर बाहेती, कार्यकारिणी सदस्य, नागरिक, महिला, बाहेरगावाचे श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.