परभणी. –
शांतीनगर येथील सुयोग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला.श्री समर्थ खटकेश्वर सेवाभावी संस्थेचे सचिव प्रा.डॉ.ज्ञानोबा मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सचिन खडके यांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन प्रा.डॉ.ज्ञानोबा मुंढे यांनी स्वागत केलं.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सिध्दार्थ गवई,शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ई-कचरा आपल्याला कशा पद्धतीने घातक आहे याबद्दल माहिती देताना प्रा.सचिन खडके यांनी सांगितले की,प्लास्टिक कुजवण्यासाठी बरेच वर्षे लागतात आणि त्याहीपेक्षा जास्त घातक म्हणजे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ई-कचरा.त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणे काळाची गरज आहे,अन्यथा याचा अत्यंत घातक परिणाम हा पर्यावरण त्याचबरोबर मनुष्य जीवनावर होऊ शकतो. याचाच एक परिणाम म्हणून कॅन्सर सारख्या भयावह आजारांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच या ई-कचऱ्याची वैज्ञानिक आणि सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या घरचा त्याचबरोबर जवळच्या पाच शेजाऱ्यांना याबद्दल माहिती देवून त्यांच्याकडील हा ई-कचरा शाळेत आणून संकलित करण्याचे आवाहन केलं.
कार्यक्रमात त्यानंतर अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.ज्ञानोबा मुंढे यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या वस्तू जसे की, पाणी बॉटल,जेवणाचा डब्बा, कॅरीबॅग,यांचा वापर न करण्याचे आवाहन केलं. त्याऐवजी स्टीलच्या पाणी बॉटल आणि डब्यांचा वापर करण्याचे सांगितले. त्याचबरोबर ई-कचऱ्याबद्दल माहिती सांगताना जुने बिघडलेले संगणक,मोबाईल,फोन,इलेक्ट्रॉनिक खेळणी,क्षमता संपलेले सेल,माऊस,की-बोर्ड,घड्याळ,बंद पडलेले रेडिओ,मोबाईल चार्जर,आणि दूरचित्रवाणी तसेच खराब झालेले स्पेअर पार्ट शाळेत आपले नाव नोंदवून जमा करण्याच्या सूचना दिल्या,जेणेकरून त्यांची योग्य विल्हेवाट लावता येईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रत्नदीप रणवीर यांनी केलं तर आभार सौ.सुचिता थोरवटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.अंजली झरकर,श्री प्रताप संदलापूरकर,रुमा वाकोडे,श्री.संदीप पांडे,संस्कृती फुटाणे,सौ.सुकन्या मरगळ,ऋतुजा राऊत,श्री.आनंद झा,शबाना अंजुम,हिराताई बोरकर आदींनी प्रयत्न केले.