परभणी,दि 07 ः
परभणी शहरात 2 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या हजरत शहा तुराबुल हक यांच्या उरूसादरम्यान होणारे आर्थिक व इतर गैर प्रकार रोखण्यासाठी प्रशासकीय उपाययोजना कराव्या अशी मागणी भाजपा नेते डॉ.केदार खटिंग यांनी राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
डॉ.खटिंग यांनी मंत्रालयात जाऊन मंत्री भरणे यांची भेट घेऊन त्यांना भाजपा महानगराध्यक्ष राजेश देशमुख यांच्यावतीने निवेदन सादर केले.
परभणीतील उरुस भरणारे ठिकाण व वक्फ बोर्डाच्या मालकीचे नसून बोली पद्धतीने दुकानांचे लिलाव केले जातात त्यातील रक्कम तीन कोटीच्या घरात असून ही रक्कम वक्फ बोर्ड स्वतःकडे घेतात,सदरील आर्थिक व्यवहारावर प्रशासनाचे कोणताही अंकुश नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतात असा आरोप डॉ.खटिंग यांनी केला आहे. परंतु या रकमेचा सार्वजनिक विकासासाठी वापर केला जात नाही, पोलीस प्रशासनाला देखील बंदोबस्ताचा मोबदला दिला जात नाही, तसेच मनपाला देखील कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही त्यामुळे यावर अंकुश लावावा, त्यासोबतच उरुस केवळ दोन ते दहा फेब्रुवारी या आठ दिवसांसाठीच भरवावा, रात्री दहा पूर्वी दुकाने बंद करण्याचे आदेश द्यावेत, जिल्हा प्रशासनाकडून शासकीय चादर चढवण्याची परंपरा बंद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी डॉ.खटिंग यांच्यासह माजी आमदार रामराव वडकुते,शिवसेना नेते आनंद भरोसे,भाजपा महानगराध्यक्ष राजेश देशमुख हे देखील उपस्थित होते.