श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध संशोधन केंद्रास भेटी

परभणी (०९) येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू व संशोधकवृत्ती वाढीसाठी गुरुवार (ता.०८) रोजी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील सहलीत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित कृषी विद्यापीठ प्रशासन, ग्रंथालयासह विविध संशोधन केंद्रास भेटी दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रशासन व्यवस्थेसह कार्यरत असलेल्या विविध अभ्यास शाखा, संशोधन शाखा, आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज असलेली अभ्यासिका आदी ठिकाणी भेट देत प्रत्येक विद्याशाखेच्या प्रशासनाच्या माध्यमातून विद्याशाखेचे दैनंदिन उपक्रम, शैक्षणिक ध्येय, आज पर्यंतची फलश्रुती, भविष्यातील आव्हाने, समाजातील विद्याशाखेची भूमिका आदी स्वरूपाच्या प्रश्नांची उकल करीत प्रशासना संदर्भातील सविस्तर माहिती प्राप्त केली. त्यांनतर विद्यापीठाच्या ग्रंथालयास भेट देऊन ग्रंथालयातील वेगवेगळ्या सुविधांची माहिती तेथील सहाय्यक ग्रंथपाल यांच्याकडून प्राप्त केली. या विद्यापीठातील ई- ग्रंथालय सुविधेअंतर्गत ग्रंथालय सभासदास वैयक्तिक स्वरूपात पुस्तक घेणे, पुस्तक परत करणे, आवश्यक त्या पुस्तकाचा शोध घेणे आदी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत प्रश्न उपप्रश्न विचारून ग्रंथालय माहिती मिळवली.
या सहलीत कला शाखेच्या तिन्ही वर्षातील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. एम एफ राऊतराहे, डॉ.गंगाधर भोसले, प्रा. केशव भंडारे आदीं उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment