एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधी होणार होता. शेवटच्या क्षणी ते तिथे पोहचले असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “एकनाथ शिंदे काल शपथ घेण्यास तयार झाले नसते तर भाजपाने त्यांच्याशिवाय फडणवीसांचा शपथविधी उरकला असता”, असा दावा शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीतील पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, याआधी पक्षाच्या आदेशाने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं होते. देशात अनेक ठिकाणी अशी उदाहरणे आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण जे मुख्यमंत्री होते, ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मंत्री म्हणून काम करत होते. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनी मंत्री म्हणून काम केले आहे. मध्य प्रदेश असेल किंवा अन्य राज्यात असे प्रसंग घडले आहेत. परंतु एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं, वर्षा बंगल्याचं, सत्तेचे मग त्यांना शिकार सोडावी वाटत नाही असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला.
दरम्यान, इतकं बहुमत असतानाही तिघांना शपथ घ्यायला १५ दिवस लागले. २३५ हून अधिक आमदार त्यांच्याजवळ होते. तरीही १५ दिवस सरकार बनवू शकले नाहीत. आझाद मैदानावर जो सोहळा झाला त्यात केवळ ३ जण होते. महाराष्ट्रासारख्या राज्याला आजही पूर्ण सरकार मिळालं नाही. आजही सर्वकाही ठीक नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते शेवटच्या क्षणी शपथ घ्यायला पोहचले, भाजपाने ठरवलं होतं, जर ते शपथ घेत नसतील तर त्यांच्याशिवाय हा सोहळा होणार होता. त्यानंतर माझे उपमुख्यमंत्रिपदही जाईल तेव्हा ते तिथे पोहचले असं संजय राऊतांनी सांगितले.