शेअर बाजारात खळबळ,दोन लाख कोटी पाण्यात

भारतीय शेअर बाजारात आज खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अनेक शेअर्सला लोअर सर्किट लागलं आहे. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालय आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने गौतम अदानी आणि अन्य अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत, ज्याचा फटका संपूर्ण शेअर बाजाराला बसला आहे.

अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्राईजेसच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची घसरण दिसली. तर अदाणी एनर्जी सोल्यूशनही लाल रंगात रंगले. अदाणी ग्रीन एनर्जी कंपनीला कंत्राट मिळविण्याबद्दल लाच दिल्याचा आरोप ठेवला गेला. या कंपनीच्या शेअरमध्ये १९.१७ टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळाली. अदाणी टोटल गॅस १८.१४ टक्के, अदाणी पॉवर १७.७९ टक्के आणि अदाणी पोर्ट्समध्ये १५ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली

याशिवाय अंबुजा सिमेंट्सच्या शेअरमध्ये १४.९९ टक्के तर एसीसी शेअरमध्ये १४.५४ टक्क्यांची घसरण झाली. अदाणी यांची समूह कंपनी असलेल्या एनडीटीव्हीच्या शेअरमध्येही १४.३७ टक्क्यांची घसरण झाली. तर अदाणी विल्मारमध्ये १० टक्क्यांची घसरण झाली.

आज सकाळी अदाणी समूहातील तीन प्रमुख कंपन्यांचे शेअर जवळपास २० टक्क्यांनी खाली आल्यामुळे एकूणच अदाणीच्या ११ शेअरवरही परिणाम दिसून आला. अदाणी समूहाचे बाजारमूल्य २ लाख कोटींनी घटले. जानेवारी २०२३ मध्ये हिडेंनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदाणी समूहाची ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी असल्याचे बोलले जात आहे.

Comments (0)
Add Comment