मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच फडणवीसांकडून माझे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे आता फडणवीसांच्या सागर या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे यांच्या या आरोपांनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी फडणवीसांचे थेट नाव न घेता भाजपाला लक्ष्य केलंय. ते माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
राजकीय परंपरा, विचारसरणी फडणवीसांनी मोडीत काढली
“आपल्या या महाराष्ट्रात धर्मवाद आणि जातीवाद कधीच नव्हता. कारण या भूमीत संतांच्या विचारांची, महापुरुषांच्या विचारांती ताकद आहे. मात्र देवेंद्र फडणवीस २०१४ साली जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून महाराष्ट्राची कोणतीही परंपरा कायम राहिली नाही. राजकीय परंपरा, विचारसरणी होती ती फडणवीसांनी मोडीत काढली. २०१४ सालानंतर महाराष्ट्रातील विचारांचं आणि राजकीय परंपरेचं नुकसान हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे,” असं रोहित पवार म्हणाले.