विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रथम कुटुंबामध्ये संवाद हवा-स्वामीराज भिसे

परभणी,दि 21 (प्रतिनिधी)ः
विद्यार्थ्यांच्या संस्काराचे प्रथम केंद्र त्याचे कुटुंब असुन त्याला व्यक्त होण्याइतकं वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रथम कुटुंबामध्ये संवाद आवश्यक आहे. तेव्हाच बालकांचा सर्वांगिण विकास होईल. असे मत श्री. स्वामीराज भिसे यांनी व्यक्त केले. परभणी येथील एच.आर.सी.संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबीराच्या समारोपप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन ते बोलत होते. यावेळी बालसंस्कार शिबीरातील 150 विद्यार्थी व 300 पालक उपस्थित होते.

दिनांक १५ मार्च ते २० मार्च या कालावधीत या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. योग, प्राणायाम, अध्यात्मिक, संस्काराचे धडे, विज्ञान खेळणी, चित्रकला कागद काम, अंतर्मनाचे सामर्थ्य, अभिनय कौशल्य, निसर्ग संवर्धन, मैदानी खेळ, पथनाट्य प्रशिक्षण, विविध कौशल्यातून मुलांमधील सुप्तगुणांना विकसित करण्याचा प्रयत्न शिबीर संयोजकांनी केला.

समारोप प्रसंगी उपस्थित बालकांकडुन आई वडिलांचे पुजन करण्यात आले. यावेळी सर्वच पालकांच्या डोळ्यात अश्रु उभा राहीले. या शिबीराचे वेगळेपण म्हणजे या शिबीरात ५० एक पालक आणि अनाथ असलेल्या बालकांना या शिबीरात मोफत प्रवेश देण्यात आला होता. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कराड येथील शिवम प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. तसेच एचएआरसी टीम डॉ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव, सौ अनुराधा अमिलकंठवार, राजेश्वर वासलवार, विनीत देशपांडे, ऍड चंद्रकांत राजुरे, सौ विना पेडगावकर,बागेश्री देशमुख, सौ विद्या राठोड, उल्हास खांबायतकर, पांडुरंग पाटणकर, शिवानी माहुरकर यांनी पूर्णवेळ मोलाचे योगदान दिले. या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॅा. पवन चांडक यांनी केले.

Comments (0)
Add Comment