गंगाखेडला रविवारी ’उद्योग मंथन’ महामेळा-युवा उद्योजक सुनील गुट्टे यांची माहिती

परभणी,दि 23 (प्रतिनिधी)ः
आमदार डॉ.रत्नाकरराव गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने गंगाखेड येथील पूजा मंगल कार्यालयात बेरोजगार युवक-युवतींसाठी रविवारी (दि.25) ’उद्योग मंथन’ महामेळा सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे.अशी माहीती युवा उद्योजक सुनील गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार डॉ.रत्नाकरराव गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने परभणीतील पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी गंगाखेड शुगर्सचे मुख्य प्रशासकीय अधिकारी ए.ए.डोंगरे, व्यापारी अनिल यानपल्लेवार, आमदार डॉ.रत्नाकरराव गुट्टे मित्रमंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख संदीप माटेगावकर, जिल्हा सरचिटणीस रवि कांबळे यांची उपस्थिती होती.

अध्यात्मिक वारसा असलेल्या गंगाखेड नगरीला कला, साहित्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून देण्यासाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे विविध उपक्रम राबवित आहेत. त्यांनी आता उद्योग विश्वाकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कृषी, अन्नप्रक्रिया, लघु व मध्यम स्वरूपाच्या 50 उद्योगाच्या वेगवेगळ्या कल्पना घेवून गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रातील नागरिक व तरूणांना आपल्याच भागात आणि परिसरात उद्योग उभारणी व वाढीसाठी पाठबळ देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यातून गंगाखेडच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल, अशी अपेक्षा युवा उद्योजक सुनील गुट्टे यांनी व्यक्त केली आहे. ’उद्योग मंथन’ महामेळ्यासाठी नावनोंदणी सुरू झालेली आहे.
सामाजिक, सांस्कृतिक तसेच कला, क्रीडा, साहित्य व रोजगार क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय काम करणार्‍या गंगाखेड येथील मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा ’उद्योग मंथन’ महामेळा आयोजित करण्यात आलेला आहे. बिझनेस कोच व स्टार्टअप कन्सल्टंट अमित रमेश मखरे हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
सुनील गुट्टे यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 मध्ये गंगाखेड येथे नोकरी मेळावा घेतला होता. त्यातून 1100 उमेदवारांना अपॉईंटमेंट लेटर्स दिले होते. त्यातील काहीजण नोकर्‍यांवर रूजू झाल्याचे त्यांनी सांगितले.
आता उद्योजक घडविण्यासाठी ‘चावडी’ या कंपनीशी करार करण्यात आला आहे. 2 लाखापासून साधारणत: 1 कोटीची गुंतवणूक असलेले आणि आपल्या भागात यशस्वी होतील असे 50 व्यवसाय-उद्योग निवडण्यात आले आहेत. या सर्व व्यवसायांसाठी लागणारी जागा, परवानग्या, भांडवल, उलाढाल, नफा, बँक कर्ज प्रकल्प रिपोर्ट याची माहिती व तांत्रिक बाबी सांगून निरंतर मार्गदर्शन केले जाणार आहे. पुढील किमान पाच वर्षे अशा प्रकारच्या ’उद्योग मंथन’ महामेळ्यांचे आयोजन करणार असल्याचे श्री.गुट्टे यांनी यावेळी सांगितले. तसेच गंगाखेड नंतर परभणी जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील असे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
युवकांनी उद्योग उभारणीसाठी पुढे यावे
जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठा वाव आहे,अनुकुल वातावरण,भौगोलीक परिस्थिती आहे.त्यामुळे कोणताही उद्योग सहज चालवु शकतो,म्हणून युवकांनी पुढे यावे,आमदार डॉ.रत्नाकरराव गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गुट्टेकाका मित्र मंडळ उद्योग उभारणीसाठी पाठीशी राहील.
संदिप माटेगावकर,जिल्हा संपर्कप्रमुख,आमदार डॉ.रत्नाकरराव गुट्टे मित्रमंडळ

Comments (0)
Add Comment