घ्या आता हिवाळ्यात पावसाळा!गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

 

राज्यातील वातावरणात बरेच बदल होताना दिसत आहेत. कधी थंडी तर कधी पाऊस तर कधी कडाक्याचे ऊन असं राज्यातील वातावरण सध्या झाले आहे. कधी तापमानाचा पारा घसरतोय तर कधी विजांच्या कडकाटासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. काही जिल्ह्यांमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. तापमानाचा पारा घसरल्यामुळे राज्यातील जनता सध्या थंडीचा अनुभव घेत आहे. तर काही ठिकाणचे नागरिक हिवाळ्यात पावसाळा अनुभवत आहेत. अशामध्ये हवामान खात्याने २७ आणि २८ डिसेंबर रोजी गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये २७ आणि २८ डिसेंबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये दुपारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्यास सुरुवात होईल.

बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर २८ डिसेंबरला विदर्भातली यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पहाटेपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहिल. तसंच, कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.
२९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल आणि ३० डिसेंबरपासून पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार कामाचे नियोजन करावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक थांबू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments (0)
Add Comment