काही महिन्यांपूर्वी ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना मुख्यनेते बनले आहेत. त्यामुळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
आशिष गिरी असे याचिका दाखल करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. तसेच, कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचे आशिष गिरी यांनी स्पष्ट केले आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा,” अशी मागणी आशिष गिरी यांनी केली आहे.
अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून सर्वांची झोप उडवली आहे. या वकिलाने ही नवी याचिका कोर्टात दाखल केली आहे. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्यावा, अशी मागणी आशिष गिरी यांनी याचिकेतून केली आहे. या याचिकेवर येत्या 24 तारखेला सुनावणी करण्याची विनंतीही त्यांनी कोर्टाला केली आहे. मात्र, कोर्टाने त्यावर अजून काही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
24 एप्रिललाच सुनावणी घ्या
दरम्यान, ठाकरे गटाच्या याचिकेवर येत्या 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गटाने याचिका सादर केली होती. या याचिकेसोबत आता पुन्हा नवी याचिका कोर्टात दाखल झाली आहे. त्यामुळे कोर्ट येत्या 24 तारखेला गिरी यांचीही याचिका सुनावणीसाठी घेणार की या याचिकेवर इतर दिवशी सुनावणी ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, आशिष गिरी यांनी सादर केलेल्या याचिकेचा आणि शिंदे गटाचा काही संबंध आहे की नाही याची काही माहिती मिळालेली नाही. त्यामुळेही तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
कोर्ट रिसिव्हर नेमा
जे काही सर्वोच्च न्यायालय ठरवेल.. समजा शिंदे शिवसेनेचे अध्यक्ष राहिले तर सर्व काही शिंदे यांना वर्ग करण्यात यावं. तोपर्यंत कोर्ट रिसिव्हर नेमून त्यावर स्टे लावावा. मीडिया रिपोर्टनुसार ठाकरे गट पार्टी फंडावर दावा करत आहे. त्यामुळे पूर्ण निकाल लागेपर्यंत या सर्व गोष्टींवर स्टे लावा. आमची सोबत सुनावणी व्हावी. कारण प्रकरण एकच आहे. उद्धव ठाकरे यांनी एक याचिका दाखल केली आहे. मीही याचिका दाखल केली आहे. दोन्ही याचिका एकत्र कराव्यात, असं आशिष गिरी यांनी सांगितलं.
शिंदे गटाशी संबंध नाही
माझी याचिका ही शिंदे गटाची याचिका नाही. त्यांच्याशी काहीच संबंध नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मी एक वकील आहे. तसाच मी मतदार आहे. महाराष्ट्रातील मतदार आहे. त्यामुळे मी याचिका दाखल केली आहे. मी शिंदेंची बाजू घेत नाही. मी कायद्याची बाजू घेत आहे. उद्या उद्धव ठाकरेच अध्यक्ष राहिले तर शिवसेना भवन, शाखा आणि निधी त्यांच्याकडे जाईल. जर शिंदे अध्यक्ष झाले तर सर्व गोष्टी शिंदेंकडे जातील. पण तोपर्यंत या गोष्टींवर स्टे आणण्यात यावा, अशी माझी मागणी आहे, असंही गिरी यांनी स्पष्ट केलं.