मुंबई,दि 28: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा एकदा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.आता होणाऱ्या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध ६० प्रकारची पदे मिळून एकूण १० हजार ९४९ पदांची केली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मार्फत राबवली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली.
क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11,903 जागांसाठी पुढील आठवड्यात ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे.
गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.