सेलू / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील नामांकित शाळांपैकी एक असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल मध्ये अत्याधुनिक रोबोटीक हब चे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न झाले .
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, शासकीय मेडिकल कॉलेज, परभणी हे होते. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख पाहुणे डॉ. सदानंद मोरे, मेडिकल सुपरीटेंड, महिला हॉस्पिटल, परभणी, डॉ. गणेश पारवे, डॉ. ऋतुराज साडेगावकर, डॉ. अपूर्वा रोडगे-पारवे, श्री. मिलिंद पवार, श्री. सतीश करवा, श्री. वीरू पौळ, मगर, काकडे, प्रा. महादेव साबळे,प्रा. कार्तिक रत्नाला, प्रा. प्रगती क्षीरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी ही रोबोटीक लॅब तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची संधी ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून मिळणार आहे. लॅबमध्ये अत्याधुनिक उपकरणे, रोबोटिक्स किट्स आणि संगणक प्रणाली यांचा समावेश आहे.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध रोबोटिक प्रकल्पांचे सादरीकरण केले. ज्याला उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली. शाळेच्या व्यवस्थापनाने ही लॅब सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि पुढील काळात विद्यार्थ्यांना या लॅबच्या माध्यमातून संशोधनाची संधी मिळेल असे आजच्या कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. सदानंद भिसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आज आपण आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी देत आहोत. आधुनिक शिक्षणात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष अनुभव घेणेही तितकेच आवश्यक आहे. या रोबोटिक लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रत्यक्ष अनुभव घेता येतील. असे प्रतिपादन आजचे प्रमुख पाहुणे डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
शाळेने उचललेले हे पाऊल निश्चितच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात मोठे योगदान देईल. मी शाळेच्या व्यवस्थापनाचे, शिक्षकांचे आणि या लॅबच्या निर्मितीमागे असलेल्या सर्व तंत्रज्ञांचे अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घ्यावा असे डॉ. साडेगावकर यांनी सांगितले.
माझ्या विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तुमचा ठसा उमठवण्यासाठी तुम्हाला इथे या रोबोटीक लॅबमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता, प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि प्रयोगशीलता वाढवणे हे तुम्हाला यशाकडे नेईल.भविष्यातील उद्योग व क्षेत्रांमध्ये रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि स्वयंचलित प्रणालींचे महत्त्व अधिक वाढणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रांमध्ये कौशल्य आत्मसात केले पाहिजे याची जाणीव आम्हाला होती. यामुळेच या रोबोटिक लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. जी आपल्या विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये शिकवण्याची संधी प्रदान करेल. असे आवाहन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना केले. या उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन अतिशय आकर्षक पद्धतीने करण्यात आले होते, ज्यामध्ये शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या प्रा. प्रगती क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले . तर प्रा. कार्तिक रत्नाला यांनी उपस्थितांचे आभार मानले .