सेलू / नारायण पाटील – सेलू शहरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये गिरीश लोडाया सरांचे मोठे योगदान राहिलेले आहे. त्यांच्या निधनामुळे सेलूच्या सार्वजनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चळवळीतील एक नि:स्वार्थी, प्रेमळ माणूस, सच्चा कार्यकर्ता, बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत सेलूकरांनी गिरीशसरांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. येथील नूतन विद्यालयाच्या सभागृहात रविवारी, २४ सप्टेंबररोजी सकाळी साडे दहा वाजता शोकसभा आयोजिण्यात आली होती. या वेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, उद्योजक महेश खारकर, प्रेमचंद लोढा, संतोष कुलकर्णी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यस्तरीय नितीन चषक क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजक म्हणून गिरीश लोडाया यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले, अशा भावना माजी आमदार लहाने यांनी व्यक्त केल्या. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या कार्यामध्ये गिरीश लोडाया हे समर्पित भावनेने एकरूप झाले होते. त्यांची उणीव सतत जाणवेल, असे डॉ.लोया यांनी नमूद केले. गिरीशसरांचे कार्य नूतन संस्थेपुरते मर्यादित नव्हते. सेलूतील विविध संस्थांशी त्यांचे स्नेहाचे, सहकार्यभावाचे नाते होते. नि:स्वार्थी आणि शिस्तबद्ध पद्धतीने ते जीवन जगले. गिरीशसरांच्या मार्गदर्शनाशिवाय गेल्या २७ वर्षांमध्ये माझा एकही कार्यक्रम झाला नाही. अशा शब्दांत भावना व्यक्त करतांना माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे भावूक झाले. सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांशी लोडाया यांचे जवळचे संबंध होते. त्यांचे एकूणच समर्पित कार्य पाहता, गिरीश सरांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही, अशा भावना अशोक काकडे यांनी व्यक्त केल्या. चिटणीस म्हणून अत्यंत नियोजनबद्ध व सर्वांना सोबत घेऊन गणेशोत्सव व्याख्यानामालेला गिरीश सरांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. हा वारसा सर्वांना पुढे न्यायचा आहे, असे संतोष कुलकर्णी म्हणाले.
सर्वांना समानतेची वागणूक देत, गिरीश लोडाया हे खर्या अर्थाने सामुहिक जीवन जगले. सर्वांना अत्यंत जवळचा वाटणारा माणूस आपण आज गमावला आहे, अशा शब्दांत प्राचार्य डॉ.कोठेकर यांनी आदरांजली वाहिली. अशोक काकडे, दत्तराव पावडे, डॉ.गंगाधर गळगे, मोहन बोराडे, प्राध्यापक ए.डी.कुलकर्णी, डॉ.सुनील कुलकर्णी, बाबासाहेब चारठाणकर, गंगाधर कान्हेकर, चंद्रशेखर नावाडे, ॲड.लहेरचंद खोना, ललिता गिल्डा, सुरेश हिवाळे आदींनी भावना व्यक्त केल्या. अनुज लोडाया यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बाबासाहेब हेलसकर यांनी शोकसंदेशाचे वाचन केले. सूत्रसंचालन अनिल रत्नपारखी यांनी केले. हंसा लोडाया, अनुज लोडाया, जिज्ञा शहा, प्रज्ञा मेपानी, पराग मेपानी, ममता शहा, जयेश शहा, शशिकांत कुलकर्णी, प्रभाकर सुरवसे, गणेश माळवे, अशोक कासार, मोहंमद इलियास, सुखानंद बेंडसुरे, अजित मंडलिक, काशीनाथ पल्लेवाड, मनीष कदम, रवि मुळावेकर, जयचंद खोना, डॉ.विलास मोरे, रवि कुलकर्णी, रामेश्वर भुतडा, लक्ष्मण बागल, शाम आढे, यशवंत चारठाणकर, हरिभाऊ चौधरी, सुधाकर नरळदकर, संतोष पाटील, उपेंद्र बेल्लुरकर, गिरीश दीक्षित आदींसह नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सकल जैन समाज, गणेशोत्सव व्याख्यानामाला, विनोद बोराडे मित्रमंडळ, पत्रकार संघ, पेन्शनर्स असोसिएशन, महिला मंडळ, विविध कला, क्रीडा, नाट्य , संगीत, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.