भारतातील HMPV व्हायरससंबंधी परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये एचएमपीव्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासूनच प्रसारित झाला आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. या संक्रमणावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही याची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. या दोनही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.
HMPV काय आहे ?
चीनमध्ये HMPV अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसची मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लागण होऊ लागली आहे. यामुळे जाणवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांच्या उपचारांसाठी चीनमधील रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. करोनाच्या साधीमधून नुकतंच अवघं जग बाहेर पडलेलं असल्यामुळे नव्या विषाणूचा प्रसार सुरू होताच सर्वच देशांमध्ये नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसला तरी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.
हे करा…
– खोकताना, शिंकताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
– साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा.
– ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
– भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.
– संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन ठेवा.
हे करू नका…
– हस्तांदोलन
– टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
– आजारी लोकांशी जवळचा संपर्क
– डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श
– सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
– डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे
HMPV ची लक्षणे काय आहेत?
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.