पत्रकार दिना निमित्त पत्रकारांचा विविध संस्थेच्या वतीने सन्मान

सेलू ( नारायण पाटील )
पत्रकारितेचा वसा चालवत सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देणाऱ्या शहर व तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त शहरातील विविध संस्था च्या वतीने आज सन्मान करण्यात आला .
गेल्या कित्येक वर्षांपासून दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या सन्मानाची परंपरा यावेळी देखील येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या वतीने जपण्यात आली .
या सत्कार सोहळ्यासाठी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर ,उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर ,संचालक तथा माजी नगराध्यक्ष पवन आड ळकर ,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी प्रास्ताविकात लाडाने यांनी बँकेच्या वतीने दरवर्षी राबवण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन बॅंकेचा लेखा जोखा सादर केला .
पत्रकाराच्या वतीने डॉ विलास मोरे व मोहसीन मामु यांनी मनोगतात बँकेच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले .
अध्यक्षीय समारोपात हेमंत राव आडळकर यांनी पत्रकारांचे बँकेला असलेले सहकार्य स्पष्ट करून दर्पण दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या .तसेच पत्रकारांना वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हुगे यांनी केले .
सेलू पोलीस स्टेशन च्या वतीने देखील दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवाचा सन्मान करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे ,सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे ,अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल ,व्हाईस ऑफ मीडिया चे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती . सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमा मागील उद्देश स्पष्ट केला .
यावेळी पत्रकारांच्या वतीने राम सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले .
पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो.व जनमत बदलाची ताकद पत्रकाराच्या लेखणीत आहे .सध्या स्पर्धेचे युग असून लवकर बातमी लागण्यासाठी देखील स्पर्धा असते .परंतु पत्रकारांनी बातमी देतांना सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे .असे विचार पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी व्यक्त केले .पत्रकार व पोलीस यांचा योग्य समन्वय असणे देखील गरजेचे आहे.असेही यावेळी बोरसे यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी पत्रकारितेचे जनक असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा सविस्तर परिचय दिला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसीन मामु यांनी केले .

Comments (0)
Add Comment