मुंबई – शिवसेनेतील अंतर्गत कलहाला अखेर वाचा फुटली आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.
रामदास कदम म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत होता म्हणून तो पाडला गेला. काही कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात घोषणा केली. त्यांच्या मागे कोण होतं हे मला माहित होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो मी किरीट सोमय्यांना कधीच भेटलो नाही. त्यांना कोणतेही कागदपत्रं दिली नाहीत. पण माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं आहे. त्यामागे अनिल परब यांचा हात असल्याचं सांगतानाच अनिल परब हे साधं निवडून येऊ शकत नाहीत. त्यांनी हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवावं, असा जोरदार हल्ला कदम यांनी चढवला.
रामदास कदम म्हणाले की, तीन चार महिन्यापासून माझ्या संदर्भात मीडिया संदर्भात उलट सुलट चर्चा सुरु आहे. माझी भूमिका सर्वांना माहीत व्हावा म्हणून माझी बाजू मांडत आहे. मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल परब यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा संपर्क नाही. माझ्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून ते राष्ट्रवादीच्या संजय कदमांना मातोश्रीवर घेऊन आले. मात्र उद्धवजींनी त्यांचं ऐकलं नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यावर सुडाची भावनेनं काम केलं, असं ते म्हणाले.
रामदास कदम म्हणाले की, संजय कदम यांना मी मोठं केलं. पण त्याने पक्ष सोडल्यानंतर भगवा झेंडा पायाखाली तुडवून जाळला. त्यांना आता हाताशी धरलं जात आहे. आमचे निष्ठावंत उदय सामंत यांना बोलावलं. आता आम्हाला त्यांच्याकडून निष्ठा शिकावी लागत आहे. अनिल परब शिवसेनेला गहाण ठेवत आहेत. गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर परब हे शिवसेनेच्या मुळावर उतरले आहेत. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. योगेश कदम आमदार आहेत. त्यांनी उमेदवार पाहिले. पक्षाला कळवलं. आणि पक्षनेत्यांनी मुलाखती घेतल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असं ते म्हणाले. एसटी कर्मचारी संप सुरु आहे आणि आत्महत्या होत आहेत. पण अनिल परब यांना वेळ नाही. अनिल परब यांची भाषा अशी आहे की ते राष्ट्रवादी नेता म्हणून बोलत आहेत. शिवसेना म्हणजे काय हे आता आम्हाला उदय सामंत सांगत आहेत. 52 वर्ष आम्ही या पक्षासाठी खर्च केले आहे, असं ते म्हणाले.