कुणावर तरी अन्याय होत असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संरपंच संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली जाते. ज्या प्रकारे ही हत्या करण्यात आली त्यावरून महाराष्ट्र हा बिहारच्या मार्गावर चाललाय का असा प्रश्न माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला. खंडणी प्रकरणात ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे तो वाल्मिक कराड अजूनही खुला फिरतोय, तर आरोपी सुदर्शन घुले फरार आहे अशा शब्दात संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अजित पवारांनी इथल्या आमदारांना मंत्री करू नये अशी मागणीही त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांच्या सात्वनासाठी संभाजीराजे बीडमध्ये गेले होते.
नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
राज्यात अशा घटना घडू लागल्या आहेत, महाराष्ट्र बिहारच्या वाटेवर चालला आहे का? पवनचक्कीच्या गोडाऊनवर सोनवणे यांना दमदाटी केली जात होती, हे विचारण्यासाठी संतोष देशमुख तिथे गेले होते. याचा राग मनात धरून त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. मात्र एवढं घडूनही पोलीस मजा पाहात राहिले, त्यातील एकाला आता निलंबित केलं आहे तर एकाला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. यात पीआयला देखील सह आरोपी करा अशी मागणी यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
एसआयटी नेमा, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना त्यावर घेऊ नका
मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या प्रकरणात जातीने लक्ष घाला अशी मागणी संभाजीराजेंनी केली. या प्रकरणाबाबत एसआयटी नेमली पाहिजे आणि एसआयटी नेमताना जिल्ह्यातील कोणताही अधिकारी यावर घेऊन नये अशी मागणीही संभाजीराजेंनी केली.
धनंजय मुंडेंना मंत्री करू नका
माझी अजितदादांना विनंती आहे की हे सगळे तुमच्या पक्षाचे लोक आहेत. जोपर्यंत देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री करू नका. ही माझीच नाही तर इथल्या सगळ्या ग्रामस्थांची भूमिका आहे. अजितदादांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी. याबाबत सगळ्या आमदारांनी आवाज उठवावा असं आवाहन मी करतो.