शब्दराज मीडिया – महाराष्ट्र व झारखंडमध्ये नुकतेच विधानसभा निवडणूक पार पडल्या असून शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज दिला आहे तर काहींनी काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी आशा दाखवली आहे. न्यूज १८ मॅट्रीजच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील २८८ पैकी महायुतीला १५०-१७० जागा मिळण्याचा अंदाज दिला आहे. या सर्व्हेत काँग्रेस नेतृत्वातील महाविकास आघाडीला ११०-१३० जागा मिळतील असं भाकीत वर्तवण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी ही राज्यातील सर्वात मोठी पार्टी (पक्ष) म्हणून समोर आली होती. भाजपाने १०५ जागांवर विजय मिळवला होता. तर, शिवसेनेने (संयुक्त) ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (संयुक्त) पक्षाला ५४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी सादर केलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपा-शिवसेना युतीला २०३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीला ८० ते ९० जागा मिळतील असं म्हटलं होतं. परंतु, भाजपा शिवसेना युतीला केवळ १६१ जागा जिंकता आल्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला ९८ जागा मिळाल्या.
एक्झिट पोलच्या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यात पॉईंट नाहीय, कारण लोकसभा निवडणूक आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे आकडे चुकले होते. लोकसभेला बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजपा स्वबळावर 272 चा आकडा ओलांडणार असं म्हटलेलं. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. भाजपाला 240 जागांवर समाधान मानाव लागलं. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्यावेळी सर्वच एग्झिट पोल्सनी भाजपाचा दारुण पराभव होईल असा अंदाज वर्तवलेला. कारण दहा वर्षापासून सत्तेत असल्यामुळे प्रस्थापित सरकार विरोधात लाट आहे, त्यात भाजपाचा पराभव होईल असा कयास होता. पण प्रत्यक्षात घडलं उलटं. भाजपाचा विजय झाला.
ज्यावेळी मतदान जास्त होतं, त्याचा अर्थ असा काढला जातो की, प्रस्थापित सरकार विरोधात एक लाट असते. पण सरकारने लाडकी बहिण सारख्या अन्य कल्याणकारी ज्या योजना आणल्या, त्यामुळे सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढल्याची एक शक्यता नाकारता येत नाही.