पतंजली आयुर्वेद बाबत महत्वाची अपडेट…. रामदेव बाबांनी मागीतली माफी,वाचा काय आहे प्रकरण..

: दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणात योगगुरु रामदेव बाबा यांनी सपशेल माघार घेतली आहे. पतंजली आयुर्वेद कंपनीला फटकारत सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबा आणि कंपनीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. सुनावणीदरम्यान रामदेव बाबांनी माफीची तयारी दर्शवली. मात्र कोर्टाने रामदेव बाबांवर चांगलेच ताशेरे ओढले.

मंगळवारी रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण हे दोघेही सुप्रीम कोर्टात दाखल झाले. रामदेव बाबांच्या वकिलांनी “आम्ही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी माफी मागतो. आपल्या आदेशानुसार स्वतः रामदेव बाबा कोर्टात पोहोचले आहेत. या प्रकरणी ते माफी मागत आहेत. कोर्टाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी. आम्ही कोर्टापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत नाही” असे सांगितले.पहिल्या चुकीसाठी आम्ही माफी मागतो, आम्हाला लाज वाटते, ही चूक पुन्हा होणार नाही. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची आमच्या मीडिया प्रमुखांना माहिती नव्हती. त्यामुळे अशी जाहिरात दाखवण्यात आली, असा दावा वकिलांनी केला.त्यावर न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने याबद्दल तुम्हाला माहिती नाही, हे मानणं अवघड असल्याचं मत व्यक्त केलं. नोव्हेंबर महिन्यात चेतावनी देऊनही पत्रकार परिषद घेतलीत, तुम्ही परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, असा इशारा कोर्टाने दिला आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती माघारी घ्याव्यात, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल. पतंजलीच्या प्रत्येक दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमागे एक कोटी रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने २०२३ मध्ये पतंजली कंपनीला दिली होती. इंडियन मेडिकल असोसिएशनने रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीच्या जाहिराती भ्रामक माहिती पसरवत असल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

Comments (0)
Add Comment