परभणी (२१) अविष्कार संशोधन महोत्सवाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या तार्किक कल्पनाशक्तीच्या बळावर वेगवेगळ्या शाखेमधून आपली संशोधनवृत्ती जोपासत नवनवीन विषय मांडतात. अशा संशोधन महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अपेक्षित असलेल्या समाजाभिमुख संशोधन निर्माण व्हावे असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील यांनी सोमवार (दि.२१) रोजी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि येथील श्री शिवाजी महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संशोधन महोत्सव आविष्कारच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्रमुख उपस्थितीत डॉ. गोपाल शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, विद्यापीठ समन्वयक डॉ.काशिनाथ बोगले, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी,उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, समन्वयक डॉ. नानासाहेब शितोळे उपस्थित होते.
नांदेड,हिंगोली,लातूर तसेच परभणी आदी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सहभागी संशोधक विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. पाटील पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांमधली चिकित्सकवृत्ती तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिगत होण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या संशोधन महोत्सवाचे आयोजन केले जाते. भारताने संशोधन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. चंद्रयान, मंगलयान या सारख्या मोहिमा संशोधकांच्या प्रयत्नाने यशस्वी झाल्या. आज विज्ञानापुढे अनेक आव्हाने उपस्थित झाली आहेत. या आव्हानांना पेलत त्यांना सोडवण्याचं काम युवा संशोधकांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, अविष्कार सारखे संशोधन महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तर वाव देतातच सोबतच विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी सुद्धा निर्माण करतात. अशा संशोधन महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांना संधी मिळते. यावेळी डॉ.गोपाल शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले, संशोधनातून आपण जागतिक स्तरावर पोहोचू शकतो याचे अनेक उदाहरणे आहेत. आज जागतिक पटलावर भारताने संशोधनाच्या बळावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही ओळख कायम ठेवून पुढे नेण्याचे काम संशोधक विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
दोन दिवस चालणाऱ्या या संशोधन महोत्सवामध्ये १३३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. कला, वाणिज्य, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान तसेच संगणक क्षेत्रातील संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांच्या वतीने सादर करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. काशिनाथ बोगले यांनी, सूत्रसंचालन डॉ. तुकाराम फिसफिसे यांनी तर आभार डॉ.जयंत बोबडे यांनी मानले. यावेळी परीक्षक, प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.