सेलू ( नारायण पाटील ) दि २०
सेलू शहर व परिसरातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बळ देणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या
धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे उदघाटन उद्या 21 डिसेंबर बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजता होत आहे. उमरखेड येथील चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती पूज्य माधवानंद महाराज यांच्या हस्ते पतसंस्थेचे उदघाटन होत असून या वेळी सेलू येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक माधवराव यादव, उद्योजक रामप्रसाद घोडके, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) कार्यालयाजवळ आयोजित या समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेच्या अध्यक्ष शिलाताई अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, पतसंस्थेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.
गेल्या दोन अडीच दशकांपासून शहर व ग्रामीण भागात महिला बचतगटांच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर भर दिला जात आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा बचतगटांना आधार मिळतो. दरम्यानच्या काळात सामाजिक कार्यकर्त्या लता आरोळे यांनी शहरात जिजामाता महिला नागरी सहकारी बँक सुरु केली होती. मात्र, पुढे तिचे देवगिरी नागरी सहकारी बँकेत विलीनीकरण झाले.तेव्हां पासून सेलूत महिलांसाठी स्वतंत्र अशी पतसंस्था असावी अशी महिला वर्गाची मागणी होती व ती आज या धनलक्ष्मी महिला नागरी पतसंस्थेच्या रूपाने पूर्ण होत आहे .या बद्दल महिलावर्गातून समाधान व्यक्त होत आहे .