पूर्णा,दि 12 ः
गाय,गंगा,गायत्री व गीता हे भारतीय संस्कृतीचे मानबिंदू आहेत .त्याचे जतन करावे.आजच्या काळात नद्यांचे प्रदूषण गंभीर समस्या बनली आहे.प्रत्येक गंगा स्वच्छ असली पाहिजे,अशी अपेक्षा भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी व्यक्त केली.
श्री क्षेत्र धनगर टाकळीत आयोजित भागवत कथा ज्ञान यज्ञात ते बोलत होते.सर्वांचं कल्याण व्हावे हाच विचार भारतीय संस्कृतीचे महानपण दर्शवितो.वयोवृद्ध,ज्ञानवृद्ध व तपोवृद्ध व्यक्तींना सन्मान देणारी ही संस्कृती आहे.भक्ती,ज्ञान व वैराग्य या गुणांनी ओतप्रोत असलेला महान ठरतो .असे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री शुकदेव महामुनी.त्यांनी भागवत कथेचा अन्वयार्थ उलगडून सांगितला.हा धर्मोपदेश जनकल्याणाची दिशा देणारा होय,असे भाष्य श्री भगरे गुरुजींनी केले.
इंद्रियांचे दमन करतात ते कर्दम असा विग्रह करीत कर्दम ऋषीची कथा सांगताना त्यांनी सध्याच्या सण समारंभातील विकृत स्वरूप व विवाहातील अनिष्ट परंपरावर टीका केली.विवाह हा सोहळा होऊ नये तर तो संस्कार म्हणून साजरा करावा.ध्रुव बाळाच्या कथेतून मातांनी बालक संस्कारात योगदान देण्याची,संस्कृती रक्षणाची आवश्यकता प्रतीपादित केली.
दरम्यान,भागवत कथेत संगीत वादक व गायकांची प्रभावी साथ लाभत आहे.त्यात व्यासपीठावर
श्री रवींद्र जोशी गुरुजी,अंध कलावंत व्हायोलिन वादक श्री पवार काका,राजकुमार मखवाना,श्री गंगाधरराव ,मिलिंद मराठे हे भगवद् कथेत सहकार्य करीत आहेत.