राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचे चित्र आहे. मराठा आंदोलकांनी जालन्यात एसटी बस पेटवून दिली. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर , जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवली, मराठा आंदोलक आक्रमक
जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तिर्थपुरी गावात आज सकाळी अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला आडवून अज्ञातांनी पेटवून दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत जरांगे फडणवीस यांच्या मुंबईच्या सागर बंगल्यावर निघाले होते. यावेळ जरांगे प्रचंड आक्रमक झाले होते. त्यानंतर आता मराठा समाज देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून पाऊलं उचलले जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद…
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनान अलर्ट झालं आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या संपर्कात एसटी प्रशासन असून, वाहतूक सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.
अंबड तालुक्यात संचारबंदी लागू
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले होते. जरांगेंच्या याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मनोज जरांगे सध्या आंतरवाली सराटी गावात असून, त्यांनी सर्व आंदोलकांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.