मराठी भाषेची अस्मिता जपण्याची जबाबदारी सर्वांची – डॉ. पी. विठ्ठल

सेलू ( प्रतिनिधी )

मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा वैभव संपन्न वारसा आहे. समृद्ध परंपरा असलेल्या मराठी भाषेची अस्मिता जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. असे प्रतिपादन कवी डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. वाचन प्रेरणा दिन आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या बद्दल स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने रविवार ( दि. १३ ) रोजी नूतन विद्यालयाच्या रा. ब. गिल्डा सभागृहात आयोजित व्याख्यानात ‘ अभिजात मराठी : सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि भवितव्य ‘ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या भाषा संकुल विभागातील प्रा. पी. विठ्ठल हे होते. व्यासपीठावर महेश खारकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. पी. विठ्ठल म्हणाले की, ‘बाराव्या शतकात यादवांच्या काळात मराठीला राजाश्रय मिळाला म्हणून मराठीचा विकास झाला. सतराव्या शतकात शिवरायांच्या काळात मराठीला वैभव प्राप्त झाले होते. त्यांनी मराठीतून राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली होती. असा इतिहासाचा मागोवा त्यांनी घेतला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहिर गव्हाणकर यांनी महाराष्ट्र आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. हरी नरके, प्रा.रंगनाथ पठारे यांचे मोलाचे योगदान आहे. मराठी साहित्यात महानुभाव साहित्य, संत साहित्य, शिवकालीन साहित्य, बालसाहित्य, कथा, कविता, कादंबरी, ललित, आत्मचरित्र, चरित्र, नाटक या अशा साहित्यकृतींनी मोलाची भर घातली आहे. आपली मायबोली मराठी मुळातच अभिजात आहे. आपण श्रेष्ठ आहोत. हे श्रेष्ठत्व टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. ‘ प्रास्ताविक ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन अश्विनी विटेकर यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर श्रोते उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment