बालविवाह रोखण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची- प्रा. डॉ. रमेश शिंदे

परभणी,दि 26 ः
बालविवाह ही एक गंभीर सामाजिक समस्या असून मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पूर्ण होण्या अगोदरच जर का मुला मुलीचा विवाह होत असेल तर तो बालविवाह म्हणून संबोधला जातो. बालविवाहामुळे शरीर परिपक्व होण्याअगोदरच मुलींवर मातृत्व लादले जाते. ज्या वयात शिक्षण घेऊन व्यक्तिमत्वाला आकार द्यायचा असतो, कारकीर्द घडवायची असते त्या वयात बालविवाहामुळे मुला मुलीवर संसाराची जबाबदारी पडते याच संसाराच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली कोवळे जीव दबून जातात. याचे अकाली मातृत्व, बालमृत्यू ,बाळंतीनीचे मृत्यू , अपंगत्व असे दुष्परिणाम संबंधितांना आणि संपूर्ण समाजाला भोगावे लागतात म्हणून याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे असे मत प्रा.डॉ. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.

बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने बाल विवाह मुक्त परभणी जिल्हा या विषयावर साखला प्लॉट परिसर (अंगणवाडी क्र. 5) येथे आज( दि.23) आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती रंगारी  या होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत लोकप्रतिनिधींचा तसेच सुज्ञ नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे प्रशासकीय यंत्रणांच्या प्रयत्नांनी व लोकांच्या सहभागाने बालविवाह मुक्त परभणी जिल्हा ही मोहीम यशस्वी होईल यात शंका नाही असे विचार श्रीमती रंगारी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.
यावेळी बालविवाह करणार नाही, करू देणार नाही व कुठे होत असेल तर संबंधित यंत्रणांना कळविले जाईल अशा प्रकारची शपथ उपस्थितांना देण्यात आली यावेळी कार्यक्रमाला नगरसेवक सुशीलभैया कांबळे ,माजीसैनिक शंकर कुटे ,अंगणवाडी सेविका श्रीमती विडेकर, श्रीमती बेरजे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक श्रीमती दानीकर  यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका सीमा देशमुख यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस नागरिक महिला व विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली.

Comments (0)
Add Comment