मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.. परंतु अद्यापही अंगणवाडी सेविकांना 50 रुपये भत्ता मिळालेला नाही .यामुळे आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून शासनाने तीन ते चार दिवसांमध्ये 50 रुपये भत्ता अदा करावा नाहीतर आंदोलन करू असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही जुलै महिन्यात जाहीर झाली. त्या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविकांवरही सोपवण्यात आलं होतं. हे अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी प्रती अर्ज 50 रुपये देण्यात येतील असे सरकारने जाहीर केलं होतं. योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ देता यावा हा त्यामागचा मूळ उद्देश होता. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी आपलं नेहमीचं काम सांभाळत लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेण्याची कामगिरीही पार पाडली. दिवस-रात्र अनेक अडचणींचा सामना करत, प्रामाणिकपणे काम करत लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरण्याचं काम त्यांनी केलं.
लाडक्या बहिणींचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी भरले असून अंगणवाडी सेविकांनी तळमळीने काम करून लाडकी बहीण योजना राबविल्यामुळेच महायुतीला भरघोस यश मिळाल्याच देखील अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे.
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना 50 रुपये प्रति अर्ज मानधन देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र निवडणुका होऊन देखील अद्यापही अंगणवाडी सेविकांच्या खात्यात पन्नास रुपये अर्ज प्रमाणे मानधन जमा झाले नसल्याने आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून येणाऱ्या तीन ते चार दिवसात खात्यावर मानधन जमा न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.