मस्साजोग गावात सध्या प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. कृपा करुन या दहशतीमधून बाहेर पडा. या सगळ्याला आपण मिळून तोंड देऊ. एकदा सगळ्यांनी सामूहिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यावर आपल्याला कोणी अडवू शकत नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, बीडचे लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि जिल्ह्यातील व राज्यातील लोक तुमचे हितचिंतक म्हणून गावकरी आणि देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहेत, अशा शब्दांत शरद पवार यांनी मस्साजोगच्या गावकऱ्यांना धीर दिला. त्यांनी शनिवारी खासदार बजरंग सोनावणे, निलेश लंके,राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासह मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी गावकऱ्यांशी आणि प्रसारमाध्यमांशी जाहीरपणे संवाद साधला.
यावेळी शरद पवार यांनी मस्साजोग गावातील जनतेला धीर देत संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खोलात जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत केली आहे. पण या मदतीने दु:ख कमी होत नाही. त्यामुळे या हत्याप्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तातडीने धडा शिकवला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. मी इकडे आलो याचं कारण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेली गोष्ट ही राज्याला न शोभणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे. ते दु:खी आहेत. आपण त्यांच्यासोबत आहोत. पण येथील स्थिती कशी दुरुस्त होईल, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.
राज्य आणि केंद्राने याची नोंद घ्यावी
‘बजरंग सोनावणे आणि इतर खासदारांनी महाराष्ट्रातील हा प्रश्न उचलून धरला. सूत्रधार पकडला पाहिजे असं सोनवणे यांनी मागणी केली. आरोपीचे संवाद कुणाबरोबर झाले, त्याची माहिती काढली पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे. विधानसभेत बीडचे आमदार क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनीही हा प्रश्न मांडला. कोणत्या समाजाचे आणि कोणत्या जातीचे आहेत हा विचार केला नाही. अन्याय झाला, त्यावर चौकशी झाली पाहिजे’ असं शरद पवार म्हणाले.