महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

बदलापूर घटनेत सरकारकडून कारवाईत दिरंगाई होत आहे तसेच याप्रकरणावर सरकारकडून येणाऱ्या प्रतिक्रिया दुर्दैवी असल्याचे सांगत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी विरोध पक्ष कोणतेही राजकारण करत नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठकी संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील महिला सुरक्षा प्रश्नावर दीर्घ चर्चा झाली. गेल्या १० वर्षात महिला असुरक्षिततेचे वाढते प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावर सरकारच्या भूमिका संवेदनशील नसल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली.

महायुतीतील एका पदाधिकाऱ्यांनी एका महिला पत्रकारासोबत अतिशय विकृत शब्दात या घटनेवर भाष्य केलंय.  ही घटना निषेधार्थ असून त्यांना या घटनेशी काहीही देणंघेणं नसल्याचे यातून दिसून आले आहे. या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देत आहोत. या आंदोलनात  महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष, घटक पक्ष, अनेक संघटना, शाळा कॉलेज, दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. सध्या घडीला महाराष्ट्रात जे अकार्यक्षम सरकार आहे, त्याला आपली जागा दाखवण्याचा प्रयत्न नागरिक करतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी बोलताना व्यक्त केला. आज मुंबई येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर नाना पटोले  यांनी ही घोषणा केली आहे.

प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण?

बदलापूर अत्याराच्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आलीय, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केलीय, ज्याने लोकसभेची निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Comments (0)
Add Comment