अतिवृष्टीने बाधित क्षेत्रांचे सरसकट पंचनामे करा-आ.गुट्टे,नुकसानीची केली पाहाणी

पूर्णा (प्रतिनिधी):-
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी बांधवांना दिलासा द्या, अशा सूचना स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहाणी करून आ.डॉ.गुट्टे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक सूचना दिल्या आहेत. याप्रसंगी प्रमुख अधिकारी पाहाणी वेळी उपस्थित होते.

विधानसभा मतदारसंघासह पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे वेळीच पंचनामे गरजेचे आहे. आपल्या महायुती सरकारने नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाणे अत्यंत आवश्यक आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त भाग त्यात हि अतिवृष्टी म्हणजे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आपल्याकडे मागील दोन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. नदी नाल्यांना पूर आले असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे काढणीला आलेली काही पिकेही धोक्यात आली आहेत. म्हणून नुकसानग्रस्त शेती व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देत असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी पूर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आ.डॉ.गुट्टे यांनी आहेरवाडी व माटेगाव येथील पूल कामाची सविस्तर पाहणी केली. तसेच कामासंदर्भात काही सुधारणा सुचविल्या.यावेळी प्रशासकीय अधिकारी, विविध गावचे सरपंच, शेतकरी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment