लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाहीत. आपण राजकारणात नाही, लोकसभा निवडणुकीत कोणाला उभे केले आहे, कोणाला पाडा हे देखील मी सांगितले नाही. पण त्याचा गैर अर्थ काढू नये. मी व समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही, आम्ही एकपण अपक्ष उमेदवार राज्यात उभा केलेला नाही. परंतु विधानसभेसाठी सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
विधानसभा लढवणार
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले. छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड येथील गोरी गांधारी मतदार केंद्राकडे जारंगे पाटील आले. आजारी असल्यामुळे ते रुग्णवाहिकेमधून मतदान केंद्रावर आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभेला उमेदवार दिले नाही मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभेला 288 मतदार संघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत.
आरक्षण विरोधकाला असा पाडा, पाच पिढ्या उभ्या राहायला नको : मनोज जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, आपला उमेदवार नसल्यामुळे, तुम्ही मतदान कोणालाही करा, पण जे सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल त्याला करा. इतक्या ताकदीने विरोधकाला पाडा की कमीत कमी पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नसल्या पाहिजेत. मराठ्यांनी एकजूट दाखवा. 288 पैकी 92-93 मतदारसंघ असे आहेत जिथे मराठ्यांचं वर्चस्व आहे. माझा राजकीय मार्ग नाही, मला तिकडे जायचं नाहीय, पण मला तुम्ही तिकडे न्यायचा प्रयत्न करताय तर माझा नाईलाज आहे. मराठा समाजासह लिंगायत समाज सर्व एकत्र येऊ. प्रश्न गोरगरिबांचा आहे, आम्हाला देणारे बनावे लागेल.
प्रत्येकाने मतदान करावे- मनोज जरांगे
मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला पाहिजे. जो उमेदवार सगे-सोयऱ्याच्या बाजूने आहे, त्याला मतदान करा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. लोकसभेला आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही. मात्र मराठ्यांना बरोबर माहिती आहे, कोणाला मतदान करायचे आहे. आंबेडकर किंवा छत्रपतींच्या गादीचा मान राखला पाहिजे.
8 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार
याशिवाय ४ जूनपासून बाजी लावणार आहे. 6 जूनपर्यंत आरक्षण न दिल्यास मी 8 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. ते म्हणाले, ”सर्वांनी आमचे वाटोळे केले आहे. पण लोकाशाहीचा हक्क बजवायला पाहिजे. मी पुन्हा आंदोलन करणार आहे. माझे शरीर साथ देत नसले तरी मी मरणाला घाबरत नाही. समाजाने काळजी करू नये. मी खंबीर आहे. आशीर्वाद आणि साथ द्या”, असे जरांगे म्हणाले.