आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ- मनोज जरांगे

मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ. आम्ही रस्त्यानं चालताना २२ तारखेला राम मंदिराचा आनंद साजरा करू, असं मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. ते अंतरवाली सरातीत पत्रकारांशी बोलत होते.

शंभुराजे देसाई यांनी मला पत्र पाठवून उद्या मुंबईत होणाऱ्या आरक्षणांबाबतच्या बैठकांना बोलावलंय पण मी या बैठकाीला जाणार नाही. उद्या ४ ते ५ मॅरेथॉन बैठका मुंबईत होणार असून ओबीसींतून मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी यांच्याकडे केलीय. सरकारनंच उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा अणि आम्हाला काय निर्णय घेतला याबाबत कळवावे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय.

आम्हाला अडवलं तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन बसू

येत्या २० तारखेपर्यंत राज्य सरकारला चर्चेची दारं खुली असून अंतरवालीतून आम्ही पाय बाहेर टाकला की सरकारसाठी चर्चेची दारं बंद होतील, नंतर चर्चा नाही, असा अल्टीमेटम त्यांनी दिला. त्याचवेळी आंदोलनात हसू होईल असं कृत्य एकाही मराठ्याने आंदोलनात करू नये, फक्त शांत होऊन आंदोलनात बसा असंही ते म्हणाले. आम्हाला अडवलं तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबई आणि मतदारसंघातील दारात जाऊन बसणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय.

मराठ्यांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा?

आता मराठा हे कुणबी असल्याचे ट्रकभर पुरावे सापडले मग आरक्षणात देण्यात अडचण काय आहे? मराठ्यांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल त्यांनी यावेळी राज्य शासनाला उपस्थित केला.

सभेत लोक दाखवतात आणि त्यांच्यावरील केसेस मागे घेतात

१३ तारखेला ओबीसींची बीडमध्ये सभा होणार आहे यावर बोलताना ते म्हणाले, ते तुमचा राजकारणासाठी वापर करतायेत. आमच्या नोंदी ओबीसींमध्ये सापडल्या आहे. आम्हाला तिथेच आरक्षण हवंय, त्यांचं ऐकून फुकटचं भांडण विकत घेऊ नका, ते इकडे सभेत लोक दाखवतात आणि त्याच्यावरील केसेस मागे घेतो, अशी टीकाही जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केली. आभाळ आलं की ते फिरतात त्यांना निबार गोळी द्या, असा टोला जरांगे पाटील यांनी सरकार आणि भुजबळ यांना मारला.

Comments (0)
Add Comment