बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार ३ आरोपींना तात्काळ अटक करा, या प्रमुख मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी बीडच्या मस्साजोग येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या होऊन २२ दिवस उलटले. तरी देखील तीन आरोपी फरार आहेत. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे तात्काळ या फरार आरोपींना अटक करावं, ही प्रमुख मागणी घेऊन ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आज मस्साजोग ग्रामस्थांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. अख्ख गाव तळ्यात उतरले आहेत. आंदोलनकांमध्ये पुरूषांसोबत महिलां देखील सहभागी झाल्या आहेत.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावकरी ज्या तलावात आंदोलन करीत आहेत. त्या ठिकाणी तहसीलदार पोहचले आहेत. तहसीदार आंदोलकांसोबत चर्चा करत आहेत. ‘लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यासाठी सीआयडीचं काम सुरू आहे. त्यामुळे तुम्ही आंदोलन मागे घ्यावा.’, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
तहसीलदार आणि पोलिसांनी आंदोलकांना तळ्यातून बाहेर पडावे अशी विनंती करत आहेत. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जलसमाधी आंदोलन स्थळी तहसीलदार आणि कर्मचारी मोठ्यासंख्येने आले आहेत. सर्व आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. या आंदोलनामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी मंगळवारी गावामध्ये दवंडी देण्यात आली होती. संतोष देशमुखांच्या तिन्ही मारेकरांना अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी गावकरी करत आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाला आज सकाळी १० वाजेपर्यंतचा वेळ दिला होता पण तिघांना अटक न झाल्यामुळे गावकऱ्यांनी मोठया संख्येने एकत्र येत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.