: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नरहरी झिरवाळ यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचं काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, संदीप गुळवे यांना आपला जाहीर पाठींबा असल्याची घोषणाच नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. तसेच, कौटुंबिक संबंधांमुळे संदीप गुळवेंना जाहीर पाठींबा देत असल्याचं नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केलं आहे.
नरहरी झिरवाळ महायुतीचे आमदार आहेत. तर संदीप गुळवे ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार आहेत. झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी झिरवाळ यांनी गुळवेंना जाहीर पाठींबा दिला आहे. झिरवाळ यांच्याकडून संदीप गुळवे यांना आगळंवेगळं रिटर्न गिफ्ट मिळाल्यामुळे गुळवे आणि त्यांचे कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे.
पक्षीय गणित बाजूला ठेवून पाठिंबा देतोय : नरहरी झिरवाळ
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेतर्फे किशोर दराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संदीप गुळवे हे काँग्रेसमधून नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. या मतदारसंघात विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून ते निवडणूक लढवत आहेत. संदीप गुळवे यांना माझ्या अगोदर शुभेच्छा देई असं वाटतं. शिक्षक मतदारसंघात पक्षीय गणित बाजूला ठेवून पाठिंबा देत आहे, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ बंद दाराआढ चर्चा झाली. यावेळी संदीप गुळवे यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर देखील उपस्थित होते. भेटीनंतर झिरवाळ यांनी संदीप गुळवे यांना जाहीर पाठींबा दिला. त्यानंतर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचं काम करण्याच्या सूचना नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.