वसमत,दि 01
वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथे मागील तीन वर्षापासून लालतोंडी माकडांच्या तीन टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक जणांना या माकडाने चावा घेऊन जखमी केले आहे, याकडे वनविभाग सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
आडगाव येथे तीन ते चार वर्षांपूर्वी गावातील काही उपद्रवी लोकांनी माळेगाव यात्रेतून दोन लाल तोंडी माकडे आणली होती. सांभाळणे शक्य नसल्याने त्यांनी गावात सोडली, या माकडांची संख्या सध्या 40 च्या पुढे गेली. तीन ते चार टोळी स्वरूपात ही माकडे संपूर्ण गावात उच्छाद मांडत आहेत, दिसेल त्याला चावा घेणे, जखमा करणे अशा स्वरूपात हानी पोहोचत आहेत. आतापर्यंत शंभर हून अधिक जणांना या माकडांनी गंभीर स्वरूपात जखमी केले आहे, दिवसभर गावात राहून या माकडांनी धुमाकुळ घातला आहे, आता यातील काही टोळ्या गाव परिसरातील शेतात देखील जात आहेत, रस्त्यावर खेळणारी लहान मुले भीतीच्या सावटाखाली आहेत, ही माकडे घरात घुसून महिलांना देखील चावा घेत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाने यापूर्वी वनविभागाला याची माहिती दिली होती, परंतु वनविभागाने केवळ एक चक्कर मारून कागदपत्रे घोडे नाचवले, पुन्हा वनविभाग गावात फिरकले देखील नाही, त्यामुळे आता आमदार राजू नवघरे यांनी लक्ष देऊन वनविभागाच्या मदतीने गावातील सर्वच माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
जो बंदोबस्त करील त्याच्याच मागे उभे राहू
आगामी काळात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे, त्यासाठी इच्छुक मंडळी कामाला लागली आहे, आता जो गावातील माकडांचा पूर्णतः बंदोबस्त करील त्याच्याच पाठीमागे भक्कमपणे उभे राहू असा निर्धार गावातील युवकांनी बोलून दाखवला आहे.