परभणी,दि 08 ः
मानधनावर काम करणाऱ्या समग्र शिक्षा योजनेतील कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केली असून या आंदोलनात परभणीतील 75 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील समग्र अभियान कार्यालयात शुकशुकाट असुन कामकाज ठप्प झाले आहे.
सर्व शिक्षा अभियान समग्र शिक्षा योजनेतील सन 2002 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा तालुकास्तरावर व महानगरपालिका स्तरावर विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी 04 मार्चपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मुंबईत अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या मांडला आहे. यामध्ये परभणी येथून 75 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.या आंदोलनामुळे जिल्हा तालुकास्तरावरील समग्र अभियान कार्यालयामध्ये शिक्षकांत दिसून येत असून समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत सहाय्यक कार्यक्रमाधिकारी, विषय साधन व्यक्ती, कनिष्ठ अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एमआयएम ऑर्डेनेटर दस्तऐवज व संशोधक सहाय्यक व वरिष्ठ लेखा सहाय्यक अशा विविध पदांवर कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हाभर गटसाधन केंद्रामध्ये सदर कर्मचारी कार्यरत आहेत. वर्षानुवर्ष कंत्राटी सेवेवर आणि तुटपुंज्या मानधनावर किती दिवस काम करावे असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या योजनेतील कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व्यवसायिक अर्रहतेनुसार शिक्षण विभागात इतरत्र रिक्त पदांवर समायोजन करावे, कर्मचाऱ्यांना सोयी सुविधांचा लाभ द्यावा, मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यभरातून 2000 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचेही उपोषण सुरू राहील असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.