परभणी,दि 25 ः
परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी संदर्भात आज झालेल्या शिवसेना व काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराजसिंह परिहार व जवंजाळ हे उमेदवार असल्याचे सांगून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी केला आहे.तसेच कॉंग्रेस-शिवसेनेच्या पॅनलशी राष्ट्रवादीचा काहीही संबध नसल्याचे देशमुख यांनी जाहीर केले.
परभणी बाजार समितीच्या निवडणुकीवरुन कॉंग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या वाद सुरु आहे.महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादीला विचारात घेतले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे.तर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस आमदार सुरेश वरपुडकर व शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार पॅनलमध्ये असल्याचे सांगीतले आहे.याला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे.त्यामुळे त्यांनी आपली भुमीका जाहीर केली आहे.
ते म्हणाले की, वास्तविक पहाता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रविराज देशमुख यांच्या विरोधात परीहार यांनी जाहीर भूमिका घेतली होती तसेच त्यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या पक्ष विरोधी कार्यवाहीची दखल घेऊन वरिष्ठांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तेव्हापासून म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकी नंतर स्वराजसिंह परिहार व राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही संबंध नाही. मागच्या चार वर्षात ते राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये, बैठकीमध्ये किंवा इतर कोणत्याही उपक्रमात सहभागी नाहीत. त्यामूळे परीहार व त्यांनी निवडलेले इतर उमेदवार यांचा राष्ट्रवादी काँगेस पक्षाशी काहीही सबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडण्याचा सर्व अधिकार राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांना आहे. आणि त्यांनी कोणतेही उमेदवार शिवसेना व काँग्रेसच्या पॅनलमध्ये सुचवलेले नाहीत. असे श्री.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना व काँग्रेसच्या विरोधातील
“बाजार समिती बचाव शेतकरी बचाव” या सर्वपक्षीय पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. या पॅनल मध्ये राष्ट्रवादी काँगेस पक्षाला अपेक्षित स्थान देण्यात आले आहे. त्यामूळे परभणी तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिवसेना व काँग्रेसच्या पॅनल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत. त्यामूळे तो महाविकास आघाडीचा पॅनल नसून शिवसेना व काँग्रेसचा स्वतंत्र पॅनल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत स्वतंत्र भुमिका घेतल्याने त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. त्यात अजिबात तथ्य नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख व परभणी विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत यांनी स्पष्ट केले आहे.