हिंगणघाट,दि 28 (प्रतिनिधी)ः
शहरात कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन मार्फत डिझाईन फॉर चेंज अंतर्गत सामाजिक बांधिलकी जोपसणारे अनेक उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता नांदगाव माध्यमिक स्कुल, हिंगणघाट येथील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांच्या संरक्षणासाठी व जगण्यास होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी स्वतः घरट्याची व्यवस्था करीत झाडांवर टांगली. त्यात पाण्यासह खाद्याची सोय केलेली असून विद्यार्थ्यांनी पक्ष्यांच्या जीवाला गारवा दिला .तसेच उन्हाची झळ सोसत अनेक मोकाट जनावरे भुकेने आणि तहानलेले असतात. त्यांची व्याकुळता लक्षात घेत स्थानिक लिट्ल एंजल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी जनावरांसाठी चारा, अन्न व पाण्याची व्यवस्था केली.दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी माणुसकीची धुरा समर्थपणे सांभाळली त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पक्ष्यांना व जनावरांना वात्सल्याचा ओलावा प्रत्यक्ष कृतीत आणून समाजापुढे पशुपक्षी प्रेमाचा आदर्श ठेवला आहे.हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनचे अधिकारी श्री. लिलेश्वर नक्षीने यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.प्राणी पक्ष्यांना सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे व होणारी परवड थांबावी यासाठी स्वतः समाजातील सर्व नागरिकांनी पुढे येऊन निसर्ग संतुलनासाठी हातभार लावला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनचे यांचे कार्य अभिनंदनीय आहे.