परभणी,दि 15 ः
परभणी विधानसभा मतदारसंघात दहा वर्षात कुठलाही नवीन उद्योग आला नाही, ना कुठला नवीन प्रकल्प, त्यामुळे विद्यमान आमदारांच्या विरोधात जनतेत तीव्र संताप आहे, हा संताप मतदानाच्या रूपातून बाहेर येणार असून बॅनरबाजी करत सोशल मीडियावर कार्यसम्राट पदवी लावणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे अशा शब्दात महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे (Mahayuti Candidate Anand Bharose) यांनी टीका केली.
भारतीय जनता पार्टी महायुतीचे परभणी विधानसभेचे उमेदवार आनंद भरोसे यांनी शहरात अधिक ठिकाणी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. शहरातील पोस्ट कॉलनी येथील साईबाबा मंदिरात त्यांनी मतदारांशी भेटून आशीर्वाद घेतला.तसेच कारेगाव येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात यांचे जंगी स्वागत केले. यावेळी विजयी संकल्प रॅली काढण्यात आली. यावेळी बोलताना भरोसे म्हणाले,परभणी विधानसभा मतदारसंघाची अवस्था अतिशय दैयनीय करुन ठेवली आहे.कुठलाही नवीन प्रकल्प आला नाही,येथील तरुणांना बाहेर रोजगारासाठी जावे लागते, कोणाच्या हाताला काम नाही, त्यासोबतच शहरात कुठल्याही सुविधा ठेवल्या नाहीत.नाट्यगृह बंद पाडले, नवीन नाट्यगृहाचे देखील काम रखडले, बस स्थानकाचे काम टक्केवारीत अडकले, त्यासोबतच शहरातील प्रमुख रस्ते देखील टक्केवारीच्या विळख्यात अडकली असा आरोप भरोसे यांनी केला, हे सर्व बदलायचे आहे आणि त्यासाठी जनतेच्या मतदान रुपी आशीर्वादाची गरज आहे त्यामुळे जनतेने दहा वर्षाचा वनवास संपवण्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा असे आवाहन भरोसे यांनी केले.
परभणीच्या विद्यमान आमदारांनी केवळ जातीपातीच्या आधारावर आतापर्यंत निवडणुका जिंकल्या आहेत.त्याचा उपयोग केवळ स्वत:साठी केला.मतदारसंघासाठी काय हे त्यांनी सांगावे.नविन काय आणले,कोणता विकास केला हे पुढे करावे,केवळ परभणीकरांना भुलथापा देण्याचे काम केले आहे-
आनंद भरोसे,उमेदवार महायुती