कोणत्याच पक्षाला मतदान नाही, नगरमधील मराठा बांधवांचा निर्धार

जोपर्यंत सरकारकडून मराठा समाजाची असणारी सगेसोयरे बाबत मागणी मान्य करुन कायदा पारित होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्ष किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नसून कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही, असा निर्णय अहमदनगरमधील मराठा बांधवांनी घेतला आहे. आज झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाभरातील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला करणारा अमोल सुखदेव खुणे यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर शपथ घेण्यात आली.

यामध्ये जोपर्यंत सरकार मराठा समाजाची सगे सोयरे बाबत मागणी मान्य करुव कायदा पारित होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्ष किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नसून कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच येणाऱ्या लोकसभेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने हजारो उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील  हे मराठा आरक्षण संदर्भात गेल्या अनेक महिन्यापासून उपोषण करत आहेत. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच जरांगे पाटलांच्या उपोषणा संदर्भात सरकारने SIT चौकशी करण्याचे ठरवले आहे. त्या आंदोलनाचा आम्हीदेखील भाग असून सरकारने आमचीही चौकशी करावी, या संदर्भात सरकारला मेल करण्यात येणार असल्याचाही ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

Comments (0)
Add Comment