परभणी,दि 05 (प्रतिनिधी)ः येथील डॉ.राजगोपाल कालानी यांच्या कुटूंबाने सुनेच्या वाढदिवसानिमीत्त अवाढव्य खर्चाला फाटा देत एका निराधार महिलेस शिलाई मशिन देत उदरनिर्वाहासाठी हातभार लावला आहे.
डॉ.कालानी कुटुंबातील सुनबाई डॉ लोरी करण कालानी यांचा रविवारी (दि.पाच) वाढदिवस. पण वाढदिवस हा अत्यंत साधेपणे साजरा करत आज त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वंचित निराधार व दुर्धर आजारग्रस्त विधवा ताईच्या सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन दिली.
गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारी एक निराधार विधवा ताई. जिच्या पतीचा 4 वर्षा पूर्वी एड्स सारख्या गंभीर आजाराने मृत्यू झाल्यावर तिने स्वतःच्या मुलीला शिक्षण देऊन सक्षम बनवून योग्य जोडीदाराशी विवाह करून दिले. ही माऊली तिच्या दिराच्या मुलांचा सांभाळ करत अत्यंत कठीण आर्थिक परिस्थिती शी तोंड देत जीवन जगत आहे. तिने एचएआरसी संस्थेशी उदरनिर्वाहासाठी फॉल पिको शिलाई मशीन संदर्भात विनंती केली होती. ज्यातून ती शिलाई करून स्वतःचा व या 2 एचआयव्ही ग्रस्त मुलांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवू शकेल.
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज अर्थात एचएआरसी संस्था कोणतीही शासकीय मदत किंवा सीएसआर न घेता केवळ लोकसहभागातून किंवा दानशूर व्यक्तींच्या मदतीतून मिळणाऱ्या निधीतून वंचितांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करते.
या वेळी वंचितांच्या मदतीसाठी धावून येणारे डॉ. कालानी दाम्पत्य व त्यांची सुनबाई डॉ लोरी करण कालानी यांनी या परिस्थितीत अत्यंत मोलाचा पुढाकार घेत व मोलाची मदत करत या महिलेला 9000/-किंमतीची USHA फॉल पिको मशीन या गरजू निराधार महिलेला डोनेट केली.वाढदिवसाच्या निमित्त डॉ लोरी करण कालानी व डॉ कालानी दाम्पत्याने केलेल्या या मदतीबद्दल संपूर्ण एचएआरसी टीमने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी डॉ.लोरी कालानी, डॉ.करण कालानी, डॉ राजगोपाल कालानी, डॉ जयश्री कालानी, डॉ. ऋषी कालानी, कालानी कुटुंब व डॉ. पवन चांडक उपस्थित होते.