मुंबई,दि 19 ः
भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं आहे. अशातच या राड्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना विरारच्या विवांता हॉटेलमध्ये रोखून धरलं. तावडेंनी ५ कोटी रुपये वाटल्याचा आणि त्यांच्याकडे असलेल्या डायऱ्यांमध्ये १५ कोटी रुपयांची नोंद असल्याचा गंभीर आरोप ठाकूर यांच्याकडून करण्यात आलेला आहे.
बविआचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकरणात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. विनोद तावडे विरारमध्ये येऊन ५ कोटी रुपये वाटणार असल्याची माहिती मला भाजपवाल्यांनी दिली होती. पण इतका मोठा राष्ट्रीय स्तरावरचा नेता असं करणार नाही, असं मला वाटलं. पण तरीही आम्ही हॉटेलात पोहोचलो. तर इथे विनोद तावडे आणि पैसे दोन्ही सापडले, असं ठाकूर यांनी सांगितलं.
भाजपमधल्या काही जणांनीच मला तावडे पैसे वाटण्यास येणार असल्याची माहिती दिली होती, असा खळबळजनक दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. त्यानंतर आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात सनसनाटी आरोप केला आहे. ‘भाजपचा राष्ट्रीय महासचिव अशा प्रकारे पैसे वाटताना पकडला जातो. विनोद तावडे भविष्यात डोईजड होतील या भीतीमधून ही कारवाई करण्यात आली. गृहखात्यानं तावडे यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर त्यांना या सगळ्या प्रकरणात पद्धतशीरपणे अडकवण्यात आलं. तावडे बहुजन समाजातून येतात. एका बहुजन नेत्याला संपवण्यासाठी हा प्रकार घडवून आणण्यात आला,’ असा आरोप राऊत यांनी केला.
या घटनेनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बोलताना विनोद तावडे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेलिकॉप्टर्समधील बॅगा तपासल्या. मग विनोद तावडे यांची बॅग तपासण्यात आली नव्हती का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. यानंतर सुषमा अंधारे यांनी ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला, पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप?’ असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
I’m always excited to check out new arrivals on StringKart.