परभणी – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान महाराष्ट्रभर राबविण्यात येणाऱ्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाचे उदघाटन येथील श्री शिवाजी महाविद्यालयात बुधवार (दि.०१) रोजी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर, ग्रंथपाल डॉ.रामदास टेकाळे, डॉ.शेषराव राठोड, डॉ.जयंत बोबडे,डॉ.तुकाराम फिसफिसे डॉ.प्रल्हाद भोपे यांची प्रमुख उपस्थिती होती. अलीकडच्या काळात तरुण वाचन संस्कृतीपासुन दुरावत चाललेला असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदरील उपक्रमाचे महत्व लक्षात घेता महाविद्यालयाच्या कै. रावसाहेब जामकर ग्रंथालयात विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ जानेवारी पर्यंत चालू राहील. या सोबतच लेखक-वाचक भेट, सामूहिक वाचन, पुस्तक परीक्षण, वाचन कौशल्य कार्यशाळा, कथा कथन स्पर्धा, सेल्फी वुईथ बुक आदी उपक्रमांचे ही आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी संयोजक ग्रंथपाल डॉ.रामदास टेकाळे यांनी दिली आहे.
सदरील उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब पोखरकर, काशिनाथ ढाकरे, एम.एस देशमुख, बालासाहेब बारहाते, के. आर. होनराव तसेच विशाखा पंचांगे, प्रणिता नवले, कृष्णा तांदळे हे परिश्रम घेत आहेत.