पतंजलीचे ‘हे’ खाद्यपदार्थ पुन्हा ठरले फेल..तिघांना कारावास

मारे 5 वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील बेरीनाग येथील दुकानातून पतंजली नवरत्न वेलची सोनपापडीचे नमुने फेल झाले. त्यावर पिथौरागढचे मुख्य न्यायदंडाधिकारी संजय सिंह यांच्या न्यायालयाने शनिवारी पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे सहायक महाव्यवस्थापक अभिषेक कुमार, कान्हा जी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड, रामनगरचे सहायक व्यवस्थापक अजय जोशी आणि दुकानदार लीलाधर पाठक यांना ६ महिने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. .

अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याच्या अनेक कलमांतर्गत आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

17 सप्टेंबर 2019 रोजी पिथौरागढच्या जिल्हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी बेरीनाग मार्केटमध्ये असलेल्या लीलाधर पाठक यांच्या दुकानातून पतंजली नवरत्न वेलची सोनपापडीचे नमुने घेतले होते. हा नमुना रुद्रपूर येथील चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. तपासणीत सोनपापडीचे नमुने निकषांच्या विरुद्ध व निकामी आढळून आले. जिल्हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यापारी लीलाधर पाठक, वितरक अजय जोशी आणि पतंजलीचे सहायक व्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्यावर गुन्हे दाखल केले.

अन्न सुरक्षा निरीक्षकांनी बेरीनागपाठोपाठ रुद्रपूर, उधम सिंह नगर आणि उत्तराखंडमधील काही दुकानांमधील पतंजली सोनपापडीचे नमुने गोळा केले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये या सोनपापडीची तपासणी करण्यात आली. या प्रयोगशाळांनी डिसेंबर २०२० मध्ये राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाला पतंजलीच्या सोनपापडीची निकृष्ट गुणवत्ता दर्शवणारा अहवाल पाठवला. त्यानंतर व्यावसायिक लीलाधर पाठक, विरतक अजय जोशी आणि पतंजलीचे सहाय्यक व्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

सुनावणीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तिघांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या कलम ५९ अन्वये सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच या तिघांना अनुक्रमे, ५,००० रुपये, १०,००० रुपये आणि २५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई करताना न्यायालयाने म्हटलं आहे की, “आमच्यासमोर सादर केलेले पुरावे हे पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट निर्देश करतात. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे या तिन्ही व्यक्तिंविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे.”

Comments (0)
Add Comment