समृद्ध शैक्षणिक विकासाचे पाईक- प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी

 

(सेलू येथील नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद सोनाजीपंत कुलकर्णी सर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. याबद्दल त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सांगून गौरव करणारा लेख.)


मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलू शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेची स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंतची अत्यंत गौरवपूर्ण वाटचाल शिक्षण क्षेत्रातील अनेकांसाठी मोठा दिपस्तंभ आहे. या शिक्षण संस्थेच्या नूतन महाविद्यालयाने विविध क्षेत्रातील गुणवंत रत्ने देशासह परदेशालादेखील दिली
आहेत. आज ती सर्वत्र चमकताना दिसतात. हे सेलू शहरासह नूतन शिक्षण संस्थेचे, नूतन महाविद्यालयाचे फार मोठे भूषण आहे.
कोणतीही शिक्षण संस्था आणि त्याअंतर्गत असलेले महाविद्यालय तिथल्या मोठ्या गुणवत्तेच्या, आदर्श तत्त्वांच्या आणि त्यासाठी धडपड करणाऱ्या संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नावर यश मिळवीत असते. याची संपूर्ण धुरा प्रत्यक्षात मूळ कार्यकारी प्रशासक म्हणून प्राचार्यवर असते. त्यासाठी पूरक, पोषक, संवर्धक वातावरणासह स्वातंत्र्य हे संस्थाचालकांकडून मिळायला हवे. नूतन महाविद्यालय याबाबतीत खुपच नशीबवान म्हणावे लागेल.
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायणजी लोया, सचिव डी. के. देशपांडे, सहसचिव माजी प्राचार्य डॉ. विनायकरावजी कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहानी यांनी नेहमीच प्राचार्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन शैक्षणिक विकासासाठी सतत त्यांची पाठराखण केली. म्हणूनच शैक्षणिक गुणवत्तेचा मोठा बहुमान नूतन महाविद्यालयाला प्राप्त होऊ शकला. प्राचार्य द. रा. कुलकर्णी सर यांनी घालून दिलेल्या सर्व तत्त्वांचे पालन करून नूतन महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा पुढे नेण्याचे कार्य प्राचार्य डॉ. शरद सर यांनी केले आहे. याची नोंद सेलू शहराच्याच नव्हे तर मराठवाड्याच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी केली
जाईल.
इ.स. 1991 ते 1993 या तीन वर्षात पदवी शिक्षणासाठी मी नूतन महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. हे माझे मोठे भाग्य आहे. प्राचार्य द. रा. कुलकर्णी सर यांच्या विचारांनी मला खूप प्रभावित केले. प्राचार्य डॉ. विनायकरावजी कोठेकर सर, डॉ. गंगाधर गळगे सर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमातील भाषणाने आमची वैचारिक झाडाझडती घेतली. आमचे वाचन आम्हाला वाढविण्याची नितांत गरज भासू लागली. त्यासाठी आम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आणि मदत करण्यात आली म्हणून आम्ही ते वाढविले. त्यामधून वैचारिक प्रगल्भता मिळवून दिली. हे सांगण्याचे कारण हे की हीच परंपरा प्राचार्य डॉ. शरद सरांनी पुढे चालविली. 6 जुलै 2006 रोजी प्राचार्य पदाची जबाबदारी घेतल्यानंतर ते सेवानिवृत्त होईपर्यंत म्हणजे तब्बल 15 वर्ष 5 महिने या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी महाविद्यालय हेच आपले कुटुंब, परिवार मानून सर्व घटकांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी कार्य केले. विविध कामासाठी मनापासून प्रयत्न करताना, झगडताना मी त्यांना पाहिले आहे. असे प्राचार्य दुर्मिळ असतात. त्यासाठी म्हणून डॉ. शरद सरांचे करावे तेवढे कौतुक, अभिनंदन कमीच आहे.
नूतन महाविद्यालयात पदवी शिक्षण घेऊन मी औरंगाबादला विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी गेलो. दोन वर्ष शिक्षण आणि दोन वर्षे नोकरी केल्यानंतर 1997 मध्ये योगायोगाने औरंगाबाद येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या परभणीत असलेल्या श्री शिवाजी वरिष्ठ महाविद्यालयात वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विषयासाठी अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो. त्यानंतर सेलूच्या जवळ आल्याचा मला खूप आनंद झाला. मी सेलूला महाविद्यालयामध्ये जात होतो. द. रा. कुलकर्णी सरांना माझ्याबद्दल खूप अभिमान आहे. ते मला आवर्जून महाविद्यालयात बोलावत असत. त्यानंतर प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर सर आणि त्यानंतर डॉ. शरद सरांनी महाविद्यालयाशी माझी नाळ घट्ट बांधून ठेवली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्तच नव्हे तर इतर अनेक कार्यक्रमात हक्काने बोलावले जायचे. नूतन महाविद्यालयाने जडणघडण केल्याची जाणीव अंतकरणातून भरून आजही येते.
माझ्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव सर यांना भेटण्यासाठी अनेक वेळा प्राचार्य डॉ. शरद सर येत असत. तेव्हा आमची आवर्जून भेट होत असे. तेव्हा खूप आनंद होत असे. प्राचार्य डॉ. शरद सर पाठीवर हात ठेवून अंतकरणातून विचारपूस करायचे. नूतन महाविद्यालयाच्या आदर्श आणि उत्कृष्ट शैक्षणिक परंपरेला आपल्या कार्यकर्तृत्वाने विस्तारन्याचे मोठे कार्य प्राचार्य डॉ. शरद सर यांनी केले आहे. त्यांना सतत विकासाचा ध्यास आहे. त्यांच्याकडे शैक्षणिक शाश्वत विकासाच्या अनेक नवनवीन काळानुरूप योजना, कार्यक्रम, उपक्रम आणि मोहिमा आहेत. महाविद्यालयामध्ये शैक्षणिक विकासाचे कार्य करीत असताना डॉ. शरद सर प्राचार्यांच्या खुर्चीमध्ये फार कमी वेळ बसायचे. हे त्यांचे मोठेपण आहे. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन कोणतेही कार्य पूर्णपणे यशस्वी करण्यामध्ये त्यांची मोठी हातोटी आहे. राज्यशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून 1996 मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य केले. त्यांचा पिंड संस्कारक्षम अध्यापकाचा आहे. तो त्यांनी प्राचार्य झाल्यानंतरही कायम ठेवला. म्हणून शैक्षणिक विकासाचे कार्य यशस्वीपणे करीत असताना त्यांनी अध्यापनही चालू ठेवले होते. सेलू शहराच्या अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग सातत्याने दिसून येतो.
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य डॉ. शरद सरांचे झपाटल्यागत शैक्षणिक विकासाचे कार्य पाहून त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्याचा पुरेपूर फायदा घेऊन प्राचार्य डॉ. शरद सरांनी नूतन महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध योजना मिळविल्या. महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट उपक्रम आणि कार्यक्रम राबविले. महाविद्यालयातील सर्व विभागाचे अत्याधुनिकीकरण करून घेतले. ग्रंथालय अत्याधुनिक ज्ञानसंपन्न केले. विविध अभ्यासक्रम सुरू केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळेच नूतन महाविद्यालयातून आयएएस, आयपीएस, उपजिल्हाधिकारी, शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक, समाजसेवक तयार होऊ शकले आहेत. ते आज जगभरात नूतन महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करीत समाजसेवा बजावतात. याची पावती म्हणून महाविद्यालयाला अनेक राष्ट्रीय, राज्य पातळीवरचे पुरस्कार मिळालेले आहेत. ही फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. सेलूसारख्या लहान शहरात नूतन महाविद्यालयाच्या माध्यमातून हे सर्व करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. अनेक वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागते. त्याची तयारी ठेवून सर्वांना सोबत घेऊन प्राचार्य डॉ. शरद सर यांनी सर्व केले आहे.
अत्यंत गुणवत्ताप्रधान, गौरवशाली तसेच ऐतिहासिक नूतन महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून निवृत्त झाले असले तरी डॉ. शरद सरांची संस्थेसह महाविद्यालयाला आणखी विकासाची झेप घेण्यासाठी फार मोठी गरज आहे. निश्‍चितपणे ते यासाठी वेळ देऊन कार्यरत राहतील. यासाठी प्राचार्य डॉ. शरद सर यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्याकडून आणखी अधिकाधिक आणि मोठे विकासात्मक कार्य व्हावे ही सदिच्छा!
इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र शिंदे सर यांनी नूतन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा!

– डॉ. रामानंद व्यवहारे
(लेखक परभणी येथील म. शि. प्र. मंडळाच्या श्री शिवाजी महाविद्यालयात वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद शास्त्राचे प्रोफेसर आहेत)

Comments (0)
Add Comment