शब्दराज ऑनलाईन,दि 05ः
उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांका गांधींनी कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. आधी नजरकैदेत ठेवलेल्या प्रियांकांवर युपी पोलिसांनी 36 तासांनी कारवाई केली आहे.
प्रियांका गांधींना काहीच वेळात कोर्टात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाऊ शकते. याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलिस हवं तेव्हा मला अटक करु शकतात पण मी शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा निश्चय बोलून दाखवत त्यांनी पोलिसांना आव्हान दिलं होतं.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आलं. यानंतर प्रियांका गांधी लगोलग पीडित कुटुबांच्या भेटीसाठी निघाल्या. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना लखीमपूरला जाण्यास मनाई करुन त्यांना ताब्यात घेतलं. गेल्या 35 तासांपासून त्या पोलिसांच्या ताब्यात होत्या.
मोदीजी उत्तर प्रदेशला या, पीडितांच्या वेदना समजून घ्या!
“लखीमपूरला या आणि शेतकऱ्यांच्या अवस्था समजून घ्या. त्यांचं संरक्षण करणं हा तुमचा धर्म आहे, सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण करणं हा संविधानाचा धर्म आहे ज्यावर तुम्ही शपथ घेतली आणि त्याप्रती तुमचे कर्तव्य आहे. जय हिंद… जय किसान”, असं ट्विट करुन प्रियांका गांधींना नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशात येण्याचं आवाहन केलं होतं.
पोलिसांच्या ताब्यात असल्या तरी ट्विटरवरुन प्रियांका गांधी सरकारला धारदार प्रश्न विचारत आहेत. “नरेंद्र मोदीजी, आपल्या सरकारने मला कोणत्याही एफआयआरशिवाय आणि ऑर्डरशिवाय पाठीमागच्या 32 तासांपासून स्थानबद्ध केलंय. पीडितांच्या भेटीसाठी निघालेल्या व्यक्तीला तुम्ही स्थानबद्ध केलंत आणि ज्यांनी शेतकऱ्यांना जिवंत चिरडलंय ते मोकाट फिरतायत. दोषींवर कारवाई कधी करणार आहात?”, असा सवाल प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरुन विचारला.