प्रभु श्रीरामचंद्रांची कथा ऐतिहासिक सत्य : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजसेलूत श्रीराम कथेची उत्साहात सुरुवात

सेलू, दि.१६, प्रतिनिधी : आपल्याकडे २०० प्रकारच्या रामकथा आहेत. यामुळे रामकथा ही काल्पनिक कथा वाटू लागली. सर्व रामकथांचा मी आदर करतो. मात्र; महर्षी वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली रामकथा ही ऐतिहासिक सत्य आहे. कारण तर्कबुद्धिला पटेल असा इतिहास महर्षी वाल्मिकी यांच्या संपूर्ण रामकथेमध्ये पाहावयास मिळतो. विशेष म्हणजे प्रभु श्रीरामचंद्रांनी केलेला एकही चमत्कार यामध्ये आढळून येत नाही. फक्त हनुमंताचे चमत्कार आढळून येतात. यात प्रभु श्रीरामचंद्रांचे फक्त मानवी जीवन दर्शविण्यात आले आहे. म्हणूनच प्रभु श्रीरामचंद्र हे मानवी जीवनाचे आदर्श असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे.
सेलू येथील नूतन विद्यालयाच्या ‘हनुमानगढ’ परिसरात बिहाणी कुटुंबियांच्या वतीने आयोजित श्रीराम कथेच्या प्रारंभप्रसंगी मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी स्वामीजी बोलत होते. कथेच्या प्रारंभी सकाळी सेलू शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध शाळांच्या सजीव देखाव्यांसह श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. दुपारी स्वामीजी हनुमानगढ परिसरात आल्यानंतर श्री दक्षिणमुखी हनुमान मंदीरात जाऊन दर्शन घेतले; तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गोमातेचे पूजन करून ध्वजारोहण केले. कथास्थळी दीपप्रज्वलन, ग्रंथ पूजन स्वामीजींच्या हस्ते झाले. सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी यांच्यासह बिहाणी कुटुंबियांच्या वतीने स्वामीजींचे यथोचित स्वागत करण्यात आले. प्रभु श्रीराम यांच्या आरतीनंतर कथेला सुरुवात झाली. या वेळी आशार्वचनपर बोलतांना स्वामीजी म्हणाले की; जे चरित्र या भारतभूमीचे प्राणतत्व आहे, आपली भारतीय संस्कृती, राष्ट्र परंपरा, संपूर्ण वैदिक धर्म एका नावामध्ये पूर्णपणे व्यापलेला दिसतो ते नाव म्हणजे श्रीराम होय. श्रीरामकथा ही मंगल कथा आहे. ज्या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो वर्षांपासून ही कथा लोक पुन्हापुन्हा ऐकतात. याचे नाट्य होतात. महाकाव्य लिहिली जातात. तरीही, यातील रस कमी होत नाही. ब्रह्मदेवाने या कथेसंदर्भात सांगितले आहे की; जोपर्यंत हिमालय उभा आहे. गंगा जमुना वाहत आहेत. पृथ्वीवरील सृष्टी आहे. तोपर्यंत ही कथा अजरामर राहणारच आहे. रामकथेची किती संस्करणे निघावेत ? रामकथांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे. रामचंद्रांचा गोडवा इतका आहे की; परिचय झाला की आपोआप वेड लागते. एवढेच नव्हे तर कथेचे श्रवण करणारांना संपूर्ण वैदिक धर्म काय आहे ? हे आपोआप कळते. धर्म म्हणजे काय ? हे कळून घ्यायचे असेल, तर भाराभर ग्रंथ वाचण्याची गरज नाही. भगवान श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे.

जीवन मूल्यांचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज

भारतातील ३५० वर्षांचा अंध:कार एका दीपस्तंभाने घालविला आहे. त्या दीपस्तंभाचे नाव म्हणजे छत्रपती शिवराय हे आहे. हा देश, मंदीर व आत्मसन्मान या सर्वच गोष्टी केवळ त्यांच्यामुळेच आज आपण अनुभवत आहोत. कारण जीवन मूल्यांचे पुरूषार्थी प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे होत. याही पुढे जाऊन सांगावयाचे झाले, तर प्रभु श्रीरामचंद्रांची नवीन आवृत्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे प्रतिपादन आशीर्वचनपर बोलतांना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे.

पूर्वपुण्याईमुळे श्रीराम कथेचा लाभ : जयप्रकाश बिहाणी

सेलू शहरात २००६ साली स्वामीजींची श्रीराम कथा आपण श्रवण केली. तब्बल १८ वर्षांनंतर हा योग पुन्हा आला हे आपले भाग्य आहे. यासाठी आईच्या आग्रहाखातर मागील चार वर्षांपासून मी स्वामीजींकडे पाठपुरावा करत होता. आजचा दिवस उगवला. मागील ४४ वर्षात आपल्या व्यस्त दिनचर्यत स्वामीजींनी एकही दिवस विश्राम घेतला नाही. त्यांच्या व्यस्ततेतून त्यांनी आपल्यासाठी जो वेळ दिला आहे. ते केवळ आपल्या सर्वांच्या पूर्व पुण्याईमुळे घडत असून हा कथा श्रवणाचा योग जुळून आलेला आहे. सेलूकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून श्रीराम कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक जयप्रकाश विजयकुमार बिहाणी यांनी प्रास्ताविकात बोलतांना केले आहे. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. सामुदायिक आरतीने कथेच्या प्रथम दिवसाची सांगता झाली. या वेळी भाविक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कथास्थळी अयोध्याधाम

नूतन विद्यालय परिसरातील ‘हनुमानगढ’ श्रीराम कथास्थळी पुरातन काळातील किल्याच्या दरवाजाची प्रतिकृती उभारण्यात आल्याने परिसरातील प्रसन्नता व भव्यता ओसंडून वाहत आहे. तसेच कथेदरम्यान नऊ दिवस भारतातील विविध पवित्र धार्मिक स्थळांची प्रतिकृती उभारून भाविकांना प्रत्यक्ष त्या धार्मिक स्थळी कथा श्रवणाचा अनुभव मिळणार आहे. कथेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी अयोध्या धामची प्रतिकृती उभारण्यात आली होती. यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. सार्थक कुलकर्णी, सुयश पौळ आणि अभिजित मोरेगावकर यांना देखाव्यात सहभाग घेतला. वेशभूषेसाठी शशिकांत देशपांडे, रवि मुळावेकर, रवि कुलकर्णी, भालचंद्र गांजापूरकर आदींनी पुढाकार घेतला होता.

Comments (0)
Add Comment