परभणी,दि 13 (प्रतिनिधी)ः
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलाच्या लाभासाठी जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांच्या यादी निश्चितीसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी पुढाकार घेतला आहे. येत्या दोन दिवसात संबंधित ग्रामपंचायती मधील घरकुल मधील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून देणार असल्याचे ग्रामसेवकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू, मानवत आणि पाथरी तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस डेटाबेस मधील प्राधान्यक्रम याद्यांची निश्चिती करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन सेलू आणि पाथरी पंचायत समितीमध्ये करण्यात आले होते.
सेलू ,पाथरी आणि मानवत तालुक्यातील ग्रामसेवकांना सूचना देताना शिवानंद टाकसाळे म्हणाले की, ग्रामीण भागातील दलित वस्ती, मातंग वस्ती, भटक्या व्यक्तींच्या वस्त्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटून पहा कुठे प्लास्टिकचे आच्छादन, कुठे तुराट्याचे कुड तर कुठे छपराचे, झोपडीचे घर दिसेल अशी विदारक परिस्थिती आहे. त्यामुळे घराची समक्ष पाहणी व पंचनामा करून गरजू, विधवा, परितक्त्या, अपंग व्यक्तींना प्राधान्याने घरकुल योजनेच्या याद्यांमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामसेवक मंडळी येत्या दोन दिवसात प्राधान्यक्रम याद्या पंचायत समिती स्तरावर सादर करणार आहेत.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी उपस्थित ग्रामसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच आपल्या विशिष्ट ग्रामीण शैलीत मार्गदर्शन करत गावातील सामाजिक परिस्थितीचे विवेचन केले आणि गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ कसा देता येईल यासाठी सूचित केले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सेलूचे गट विकास अधिकारी विष्णू मोरे, मानवतचे गट विकास अधिकारी स्वप्नील पवार, पाथरीचे गट विकास अधिकारी सुहास कोरेगावे, डीआरडीएचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंकुश पाठमासे, शाखा अभियंता एस एस वसेकर, विस्तार अधिकारी नारायण शिंदे, सर्व तालुक्यांचे पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.