परभणी,दि 24 ः
परभणी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराने विकासावर निवडणुक न लढवता धर्माचा आधार घेत एका विशिष्ट समाजाला हाताशी धरुन वोट जिहाद करत पैशाच्या जोरावर विजय मिळवला असा आरोप आज रविवारी (दि.२५) झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी केला.तसेच आमच हिंदुत्व काय आहे ते विकासकामे आणि शहरातील हिंदु मंदिराच्या विकासातून दाखवणार असे जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर प्रताप देशमुख, शिवसेनेचे नेते भास्करराव लंगोटे, राजू कापसे, जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, शंकर भागवत, रामेश्वर आवरगंड, खंडागळे आदी उपस्थित होते.
श्री.भरोसे यांनी परभणी मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने आपण ही निवडणूक लढविल्याचे सांगितले.
प्रचारादरम्यान शहरातील अंतर्गत रस्ते, भुमिगत गटारे, ग्रामीण भागातील रस्ते, शेतरस्ते, गावांना जोडणारे रस्ते करण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळेच जनता मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी राहिली, असे ते म्हणाले. परभणीतील मुस्लीम बहुल भागातील वोट जिहादवर आ.पाटील निवडून आले. लोकसभेच्या निवडणुकीपाठोपाठ विधानसभेलाही मुस्लीम समाजाने आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अशा लोकांना हाताशी धरून महाविकास आघाडीने परभणीत वोट जिहाद सुरू केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यासाठी वंचितकडून अर्ज दाखल केलेले माजू लाला यांना सोयीस्करपणे बाजूला करण्याची खेळी खेळण्यात आली. आगामी निवडणुका देखील अशाच प्रकारे लढविल्या जाणार असतील तर आम्ही हिंदुत्ववादी म्हणून त्याच्याविरुध्द लढा देऊ.
परभणी शहरातील नागोबा देवस्थान, माळी गल्लीतील पुरातन शिवमंदीर, प्रभावती मंदिराच्या विकासासाठी महायुती सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. परभणी मतदारसंघात कुठल्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रताप देशमुख यांनी आमदार राहुल पाटील यांच्यावर घनाघात केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठवाड्यातील पहिल्याच भाषणात परभणी जिल्ह्यासाठी केलेल्या घोषणा उध्दव ठाकरे पूर्ण करु शकले नाहीत. स्थानिक नेतेही विकासाच्या केवळ वल्गना करीत असल्याचा आरोप केला.शहरासाठी काय केल ते सांगाव असे आवाहन केले.